पिंपरी (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
         महापालिका शाळांप्रमाणे गेल्यावर्षी दहावी, बारावीत उल्लेखनीय यश मिळविलेल्या खासगी शाळांतील एक हजार 869 विद्यार्थ्यांनाही बक्षीस देण्याच्या विषयाला स्थायी समितीने शुक्रवारी (ता. 29) मंजुरी दिली. त्यानुसार विद्यार्थ्यांना दोन कोटी 23 लाख 75 हजार रुपयांचे वाटप करण्यात येणार असल्याचे स्थायी समिती सभापती अतुल शितोळे यांनी समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. 
 महापालिका शाळांतील दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांप्रमाणे हद्दीतील मान्यताप्राप्त खासगी शाळांतील विद्यार्थ्यांनाही नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत बक्षीस देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. त्यानुसार गतवर्षी दहावी, बारावीतील यशवंत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले होते. दोन हजार 762 पैकी 893 प्राप्त अर्ज छाननीत बाद झाले. एक हजार 869 विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यास स्थायीने मान्यता दिली. त्यात 85 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे दहावीतील 1732, तर बारावीतील 137 जणांचा समावेश आहे. 85 ते नव्वद टक्के गुण मिळविणाऱ्याला दहा हजार, तर 90 टक्‍क्‍यापुढे 15 हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे.

 

 
Top