मेलबर्न (वृत्तसंस्था- पुणे सुपरफास्ट न्यूज) -
भारतीय महिला
आणि पुरुष खेळाडूंनी शुक्रवारी मैदानावर इतिहास घडवला. महिला आणि पुरुष क्रिकेट
संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची ‘टी-२०’ मालिका
जिंकताना ऑस्ट्रेलियात प्रथमच एखादी मालिका जिंकण्याची कामगिरी केली. त्याच वेळी
सानिया मिर्झाने मार्टिना हिंगीसच्या साथीत ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत महिला
दुहेरीतील आणखी एक विजेतेपद मिळविले.
मार्टिना हिंगिससह खेळतानाची अद्भुत कामगिरी
कायम राखत सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलियन
खुल्या टेनिस स्पर्धेत जेतेपदाची कमाई केली. गेल्यावर्षी एप्रिल
महिन्यात सानियाने अनुभवी मार्टिना हिंगिसच्या साथीने खेळण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून या जोडीने आंतरराष्ट्रीय जेतेपदांवर दबदबा
राखला आहे. अव्वल मानांकित या जोडीने
लौकिकाला साजेसा खेळ करत चेक प्रजासत्ताकच्या
तुल्यबळ जोडीला नमवत जेतेपदावर नाव कोरले. यानंतर झालेल्या मिश्र
दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत इव्हान डोडिगच्या साथीने खेळणाऱ्या
सानियाला पराभवाला सामोरे जावे लागले.
सानिया-मार्टिना
जोडीने आंद्रेआ लाव्हाकोव्हा आणि ल्युसी राडेका जोडीवर ७-६ (१), ६-३
असा विजय मिळवला. या जोडीचे हे सलग तिसरे ग्रँड स्लॅम जेतेपद
आहे. जेतेपदासह सानिया-मार्टिना जोडीने सलग ३६ लढतीत अपराजित
राहण्याचा विक्रमही प्रस्थापित केला आहे. या लढती
जिंकताना या जोडीने सलग आठ जेतेपदांवर नाव
कोरले आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे सानियाचे दुसरे
जेतेपद आहे. २००९ मध्ये सानियाने महेश भूपतीच्या साथीने खेळताना मिश्र दुहेरी प्रकारात जेतेपद पटकावले होते. सानिया-मार्टिना जोडीला सातत्याने संघर्ष करावा लागला. दोन्ही जोडय़ांना सव्र्हिस राखण्यात
अपयश येत असल्याने सामन्यातली चुरस वाढली.
लाव्हाकोव्हाने बेसलाइनवरून तर राडेकाने
नेटजवळून सुरेख खेळ करत सानिया-मार्टिना जोडीला टक्कर दिली. मिश्र दुहेरी प्रकारात एलेना व्हेसनिना आणि ब्रुनो सोरेस जोडीने
सानिया-डोडिग जोडीवर ७-५, ७-६ (४) अशी मात
केली.
