वृत्तसंस्था (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
        तीव्र पाणीटंचाईचा फेरा मागे लागलेल्या लातूरकरांना आतापर्यंत १५ दिवसांतून एकदा नळावाटे कसेबसे पाणी मिळत होते. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरणात जेमतेम एक दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असल्यामुळे यापुढे फेब्रुवारीत नळाद्वारे एकदाच पाणी देता येईल. नळाऐवजी टँकरद्वारे पाणी देण्याचा पर्याय प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासून लातूरकरांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे.
लातूर शहराच्या पाणीप्रश्नी सरकार गंभीर असून, प्रसंगी रेल्वेने पाणी देऊ, मात्र लातूरकरांना तहानलेले ठेवणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सप्टेंबर महिन्यात जाहीर केले होते.
उजनी धरणातून रेल्वेने पाणी पुरवण्याचा विचार सुरू असताना सोलापुरातील काँग्रेसच्या नेत्यांनी,‘प्रसंगी रक्ताचे पाट वाहतील; पण पाणी देणार नाही,’ असा इशारा दिला.
त्यानंतर उस्मानाबाद शहराला उजनी धरणातून मिळणारे अतिरिक्त पाणी लातूर शहराला उपलब्ध करण्यावर विचार झाला. उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह यांनी आधी उस्मानाबादला प्राधान्य, नंतर लातूरचा विचार, असे म्हटल्यामुळे पुन्हा अन्य पर्यायाचा शोध सुरू झाला. निम्नतेरणा प्रकल्पातून ८ एमएलडी पाणी लातूर शहराला देता येईल हा पर्याय समोर आला. त्यालाही उस्मानाबादेतील मंडळींच्या विरोधामुळे अडथळा निर्माण झाला. आता ४ एमएलडीपेक्षा कमी पाण्याचा नवीन प्रस्ताव दाखल होत आहे.
रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी धरणाचे पाणी जलवाहिनीतून लातूर शहराजवळ आणून तेथून टँकरद्वारे ३५ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक टँकर पाठवून देण्याचा प्रयत्न आहे. टँकर व पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पाणीपुरवठय़ात वाढ केली जाईल. नळाद्वारे पाणी देता येईल इतका पाऊस पडल्याशिवाय लातूरच्या नळाला पाणी येणार नाही. त्यामुळे नळधारकांना तोपर्यंत आपले नळ बंदच ठेवावे लागतील.


 
Top