वृत्तसंस्था (पुणे सुपरफास्ट न्युज) -
भारतीय जनता पक्षाच्या
संघटनात्मक निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांच्या सभापती
निवडींमधून जिल्ह्य़ात भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी
तीव्र झाला असून आगामी काळात भाजपतर्फे ‘एकला चलो रे’ धोरण अवलंबले जाण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या
पक्ष संघटनात्मक निवडणुका
गेल्या आठवडय़ात अपेक्षेनुसार बिनविरोध
पार पडल्या. त्यामध्ये पक्षाचे माजी
आमदार बाळ माने यांची जिल्हाध्यक्षपदी
झालेली निवड आणि त्यानंतरच्या
त्यांच्या वक्तव्यांमधून सेनेशी
संघर्षांचा पवित्रा पुरेसा स्पष्ट झाला
आहे. शहर व तालुक्याच्या राजकारणात
सध्या शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांचे
वर्चस्व असून रत्नागिरी पंचायत
समितीच्या अध्यक्षपदी त्यांचे कट्टर समर्थक
बाबू म्हाप यांच्या निवडीतून पक्ष
पातळीवरही त्यांचे वजन वाढल्याचे स्पष्ट
झाले आहे. भाजपचे नवनिर्वाचित
जिल्हाध्यक्ष माने यांचा त्यांनी गेल्या सलग तीन विधानसभा
निवडणुकांमध्ये पराभव केला आहे. त्यामुळे माने व सामंत यांच्यातील राजकीय
वितुष्ट टोकाला गेले आहे. जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर
पत्रकारांशी बोलताना माने यांनी जिल्ह्य़ात भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष
बनवण्याची केलेली घोषणा या राजकीय संघर्षांची पुढची पायरी मानली जाते. या
वर्षअखेरीला होणाऱ्या रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकांच्या वेळी
सेनेशी युती करण्याबाबतचे पत्तेही त्यांनी उघड केलेले नाहीत. राज्याच्या
अन्य भागांत झालेल्या नगर परिषद निवडणुकांमध्ये या दोन्ही पक्षांनी
स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले होते. जिल्ह्य़ातील देवरुख आणि लांजा नगर
पंचायतीच्या निवडणुकांमध्येही भाजपने तेच धोरण अवलंबले. स्वाभाविकपणे
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीतही पक्षाची तीच भूमिका राहील, अशी चिन्हे आहेत.
