पेशावर (पुणे सुपरफास्ट न्युज)-वृत्त्स्संस्था
                    पेशावरपासून जवळच असलेल्या चारसद्दा येथील प्रथितयश विद्यापीठावर केलेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे पाकिस्तान आज पुन्हा एकदा हादरले. पाकिस्तानातील वायव्येकडील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाचा खान विद्यापीठात आज दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात एका प्राध्यापकासह सुमारे 19 जणांचा मृत्यू झाला असून, 50 पेक्षा अधिक जण जखमी झाले. सुरक्षादलांनी चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता अनधिकृत सूत्रांनी व्यक्त केली आहे.
पेशावरपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या चारसद्दा येथे बाचा खान विद्यापीठ असून, सशस्त्र दहशतवाद्यांनी बुधवारी सकाळी विद्यापीठात प्रवेश करून विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर बेछूट गोळीबार केला. वसतिगृह आणि वर्गांमध्ये उपस्थित असलेले विद्यार्थी आणि प्राध्यापकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सरहद्द गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खान अब्दुल गफार खान ऊर्फ बाचा खान यांचे नाव या विद्यापीठाला देण्यात आले असून, बाचा खान यांची आज (ता. 20) पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त विद्यापीठात मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सुरू असतानाच दहशतवादी हल्ला झाला. हल्ला झाला तेव्हा विद्यापीठात सुमारे तीन हजार विद्यार्थी उपस्थित होते. तसेच, मुशायऱ्याच्या कार्यक्रमात सहाशे जण सहभागी झाले होते, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. फझल रहीम यांनी दिली.




 
Top