सातारा ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे समाजकार्य संपूर्ण देशासाठी दिशादर्शक ठरले आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्म गाव नायगावच्या विकास आराखड्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज दिले.
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती खंडाळा व नायगाव ग्रामपंचायत यांच्यावतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी नायगाव येथे आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु वासुदेव गाडे, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, सरपंच मनोज नेवसे माजी आमदार कांताताई नलावडे, कमलताई ढोले-पाटील, आदी यावेळी उपस्थित होते.
दुर्गम भागात जन्म घेतलेल्या सावित्रीबाईंनी समाजात नवी विचाराची प्रेरणा दिल्याचे सांगून पालकमंत्री श्री. शिवतारे पुढे म्हणाले, या विचारांचे आता मंथन होणे गरजेचे आहे. समाजामध्ये आपल्या मुलाऐवजी आपली मुलगी डॉक्टर, इंजिनिअर, पायलट झाली पाहिजे असे विचार समाजामध्ये रुजले पाहिजेत. या दांपत्याच्या प्रयत्नांतून फार मोठे सामाजिक कार्य उभे राहू शकले. स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या कार्यात सावित्रीबाईंचे अतुलनीय योगदान आहे. पालकमंत्री या नात्याने मी व्यक्तिश: नायगावचा विकास आराखडा पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करेन. येथील विकास कामांबाबत निधी उपलब्ध करुन दिला जाईल व येथील शाळेच्या समस्या सोडविण्यासाठी 15 ते 20 दिवसात बैठक घेतली जाईल, असे आश्वासनही त्यांनी शेवटी दिले.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, नायगाव हे स्त्री शिक्षणाचे तीर्थक्षेत्र व्हावे. सावित्रीबाईंच्या विचारांची देवान-घेवाण होण्यासाठी हा कार्यक्रम दोन दिवसांसाठी घ्यावा. यामुळे त्यांच्या विचारांचे मंथन होईल. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करुन घ्यावा. या कार्यक्रमांमध्ये सामाजिक संस्थेचाही सहभाग घ्यावा. तसेच मर्ढे येथील कवी बा.सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाचेही उद्घाटन लवकर करा, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.
श्री. भुजबळ म्हणाले की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेने स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली. भारतातल्या पहिल्या विद्यार्थींनी, शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचा इंग्रज सरकारने गौरव केला होता. त्यांच्या कार्याचे कायमस्वरुपी स्मरण व्हावे म्हणून आपण पुणे विद्यापीठाचे 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' असे नामकरण केले आहे. त्यांच्या नायगाव या जन्मभूमीच्या विकासाचेही काम आपण हाती घेतले होते. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात त्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी आमदार मकरंद पाटील, कांताताई नलावडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु वासुदेव गाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी पालकमंत्री श्री. शिवतारे आणि इतर मान्यवरांनी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास भेट देऊन अभिवादन केले; त्यानंतर सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे व ग्रामपंचायत नायगाव यांच्या संयुक्तविद्यामाने सुरु करण्यात आलेल्या ग्रंथालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, जिल्हा परिषदेच्या विशेष समित्यांचे सभापती, खंडाळा पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top