सिडनी(वृत्तसंस्था-पुणे सुपरफास्ट न्यूज)  - 
    भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी सलग २८वा विजय नोंदविला. याबरोबरच त्यानी गिगी फर्नांडेझ-नताशा झ्वेरेवा यांच्या १९९४ मधील विश्‍वविक्रमाशी बरोबरी केली. सानिया-हिंगीस यांनी चीनची चेन लियांग-शुआई पेंग यांच्यावर ६-२, ६-३ अशी मात केली.
      सानिया-हिंगीस यांनी याबरोबरच उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी ५९ मिनिटांतच हा सामना जिंकला. त्यांनी पहिल्या सेटमध्ये प्रतिस्पर्धी जोडीची सर्व्हिस दोन वेळा भेदली. त्यांनी एक ब्रेकपॉइंट वाचविला. दुसऱ्या सेटमध्येही चिनी जोडीच्या कमकुवत सर्व्हिसमुळे त्यांना फारसे प्रयास पडले नाहीत. 
     सानिया-हिंगीस यांनी नऊपैकी दोन ब्रेकपॉइंट जिंकले. त्यांना विजयासाठी तेवढे पुरेसे ठरले. आता त्यांच्यासमोर रॅलुका ओलारू-यारोस्लावा श्‍वेडोवा यांच्याशी लढत होईल. सानिया-हिंगीस यांनी गेल्या मोसमात वर्चस्व राखले. प्रथमच एकत्र आल्यानंतर त्यांनी केलेली कामगिरी सनसनाटी ठरली आहे. यंदा त्यांच्याकडून चाहत्यांना आणखी अपेक्षा आहेत.




 
Top