वृत्तसंस्था (पुणे सुपरफास्ट न्यूज)
          एखादं रोपटं लावून त्याची प्रसिद्धी घेणाऱ्यांची संख्या समाजात लक्षणीय आहे. परंतु प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहत गेली 36 वर्षे अव्यह्यातपणे झाडे लावत आसाममधील ब्रह्मपुत्रे वालुकामय प्रदेशाला जंगलाचे रूप देण्याचे काम एका आदिवासी व्यक्तीने केले आहे. या व्यक्तीच्या कामाची देशानेच नव्हे तर जगानेदेखील आता दखल घेतली आहे. जादव पायेंग असे या अवलिया व्यक्तीचे नाव आहे. "ग्रीन इंडियाचे ते स्वप्न पाहत आहेत. 
    पायेंग दहावीत शिकत असताना एका वर्षी उष्माघातामुळे ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यावर शंभर ते दीडशे साप मरण पावल्याचे त्यांना दिसून आले. साप कशाने मृत्युमुखी पडले?, साप वाचविण्यासाठी काय केले पाहिजे? हे ते शोधत असताना गावातील कृषी तज्ज्ञ येदूनाथ बेसबुरवा यांनी साप वाचविण्यासाठी झाडे लावण्याचा त्यांना सल्ला दिला. तेथूनच त्यांनी झाडे लावण्याच्या कामाला सुरवात केली.    
  ब्रह्मपुत्रेच्या वालुकामय प्रदेशात दररोज झाडे लावण्याचा पायेंग यांचा उपक्रम सुरू आहे. केवळ झाडे लावायचेच नाही तर ते जगली पाहिजेत, या करिता ते प्रयत्न करीत आहेत. हे काम करीत असताना लोकांनी त्यांना वेडंही ठरवलं. पण एक ध्येय घेऊन ते काम करीत आहेत. झाडे लावणे हे त्यांचे जीवनकार्य समजून 36 वर्षांत 25 किलोमीटर अंतरात एक हजार 370 हेक्‍टर क्षेत्रात जंगल उभारले आहे.

 
 
Top