पठाणकोट (पुणे सुपरफास्ट न्यूज-वृत्तसंस्था) -
       पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझर व त्याचा भाऊ अब्दुल रहमान रौफ यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचा दावा बुधवारी पाकिस्तानकडून करण्यात आला. जैशच्या अनेक अड्डय़ांवर धाडी टाकून संघटनेच्या अनेक सदस्यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे पाक सरकारने स्पष्ट केले. मात्र, या सर्वाना कुठे स्थानबद्ध करण्यात आले आहे याचा तपशील देण्यास पाकिस्तानी सूत्रांनी नकार दर्शवला आहे. दरम्यान, अझरवरील कारवाईबाबत पाककडून कोणतीही अधिकृत माहिती आपल्यापर्यंत आली नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाच पाकिस्तानने अझरवर कारवाई केली. पठाणकोट हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर, ‘पाकिस्तानने दोषींवर कारवाई करण्याची तत्परता दाखवली तरच ही चर्चा होऊ शकेल’, असे भारताने गेल्याच आठवडय़ात ठणकावले होते.



 
Top