मुंबई (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
       अनेक अजरामर कवितांनी आणि अविट गीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. पाडगावकर यांचे पार्थिव दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शीव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. पाडगावकरांच्या जाण्याने मराठी साहित्य वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. पाडगावकरांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ ते कविता लिहित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याला १० मार्च १९२९ रोजी रोजी पाडगावकरांचा जन्म झाला. वयाच्या १४ व्या वर्षापासूनच त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. मुंबई विद्यापीठातून त्यांनी मराठी आणि संस्कृतमधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर काही वर्षे ते रुईया महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करीत होते.
६० आणि ७० च्या दशकात पाडगावकर, ‘ज्ञानपीठविजेते कवी विंदा करंदीकर आणि कवी वसंत बापट यांचे एकत्रित काव्यवाचनाचे कार्यक्रम राज्यात अनेक ठिकाणी झाले. पाडगावकर यांनी लिहिलेली या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वाराही गाणीही खूप गाजली. प्रेम म्हणजे प्रेम असंत, तुमचं आमचं अगदी सेमअसतं, ही त्यांची कविताही विशेष गाजली होती.
दुबईमध्ये झालेल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे पाडगावकर अध्यक्ष होते. उतार वयातही त्यांनी अनेक कार्यक्रमांमधून आपल्या कविता सादर करून रसिकांचे मन जिंकले. २०१३ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २००८ मध्ये त्यांना राज्यातील प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८० मध्ये त्यांच्या सलाम या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.


 
Top