तिवसा (पुणे सुपरफास्ट न्युज) -
              महागडय़ा सौरऊर्जा वा इतर कुंपणांवर होणारा खर्च टाळण्यासाठी शेतकरी आपल्या शेतातील कुंपणात जिवंत विद्युत प्रवाह सोडतात आणि ते आत्मघाती पाऊल ठरते, मात्र तिवसा येथील स्वप्निल अंबुलकर या तरुणाने कल्पकतेच्या बळावर अल्पखर्चात पीक संरक्षक यंत्र बनवले आहे. त्यातून कुणालाही इजा होत नाही. त्याच्या या यंत्राची चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे.
विदर्भातील बहुतांश शेती ही कोरडवाहू. अधिक उत्पादनासाठी सिंचन सुविधेची गरज असते, तशीच गरज असते ती त्यांच्या पिकांच्या सुरक्षिततेची. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या येथील शेतीत पिकांचे संरक्षण न करता आल्यास त्याला मोठा फटका सहन करावा लागतो. गरीब शेतकऱ्याला कुंपणाचा खर्च झेपत नाही. त्यातच २३ ते ३२ हजार रुपयांपर्यंत किंमत असलेल्या सौरऊर्जा कुंपणाची तो कल्पनाही करू शकत नाही. रानडुकरांसह अन्य वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी कुंपणाच्या तारांमध्ये २४० व्होल्टचा विद्युत प्रवाह सोडतात, पण दुर्लक्षामुळे प्रसंगी जिवितहानीही घडते. वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांसाठी स्वप्निल अंबुलकर या ध्येयवेडय़ा तरुणाने बॅटरीवर चालणारे विद्युत यंत्र विकसित केले आहे. स्वप्निल अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा. विज्ञानाकडे त्याचा कल, पण बारावीत कमी गुण मिळाल्याने विज्ञान शाखेत त्याला प्रवेश दिला गेला नाही. त्याने बी.कॉम केले, पण त्याला अभियांत्रिकीची आवड असल्याने मोबाइल दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले आणि स्वत:चा व्यवसायही सुरू केला. वडिलांच्या शेतीतही तो लक्ष देऊ लागला. तेव्हा त्याला जनावरांकडून होणारी पीकहानी आणि शेतकऱ्यांची तगमग कळली. आपले ज्ञान आणि कल्पकतेचा वापर करून त्याने कमी खर्चात पीक संरक्षक यंत्र बनवण्याचा निर्णय घेतला. साधनांची जुळवाजुळव करून पहिले यंत्र बनवले. त्याचे प्रात्यक्षिक त्याने आपल्या शेतात घेतले आणि त्याला यशही मिळाले. १२ व्होल्ट दाबाची बॅटरी, इलेक्ट्रॉनिक सर्किट, अ‍ॅम्पिअर मीटर, प्लग आणि स्विच याचा अंतर्भाव असलेले हे यंत्र कुंपणाच्या तारांना जोडले की, रात्रभर शेतकऱ्याला निश्चिंतपणे झोपता येऊ शकते. त्यासाठी केवळ पाच तास बॅटरी चार्ज करावी लागते. या यंत्रात एलईडी दिवाही लावण्यात आला आहे.
प्राण्यांचा या तारांना स्पर्श झाल्यास त्याला किंचित असा विद्युत धक्का जाणवतो आणि तो नंतर कुंपणाच्या वाटेला जात नाही. या धक्क्यातून प्राण्याला किंवा मनुष्यालाही कोणत्याच प्रकारची इजा होत नाही. त्याचा हा प्रयोग यशस्वी झाल्याची माहिती परिसरात चर्चेला आली आणि अनेक शेतकऱ्यांनी त्याच्याकडून यंत्र बनवून घेतले.



 
Top