गुरू-शिष्य
परंपरा व वादनाच्या पारंपारीक शैलीचे जतन झाले पाहिजे.- असे मत तालयोगी पंडित सुरेश
तळवलकर यांनी तालविश्व पुरस्कार सोहोळ्या दरम्यान व्यक्त केले.
पुणे (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
तालविश्व
या पुण्यातील संस्थेतर्फे बालगंधर्व रंगमंदिर
येथे संगीत विरासत कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले होते. कार्यक्रमाची सुरवात टेंपल
ऑफ फाइन आर्ट्स इंटरनॅशनल च्या मलेशिया, ओस्ट्रेलिया व सिंगापुर येथील शाखांमधे तबला
वादन शिकणार्या व तालविश्वच्या विद्यार्थ्यांनी केली. नंतर दिल्ली
घराण्याचे ज्येष्ठ तबला वादक उ. रशीद
मुस्तफा थिरकवा व त्यांचे सुपुत्र व शिष्य तबला वादक व गायक शारीक मुस्तफा यांच्यात
जुगलबंदी झाली. त्यांनी पेशकार, तोडे, कायदे, या बरोबरच दिल्ली घराण्याच्या खास बंदिशी
सादर केल्या. त्यांना चिन्मय कोल्हटकर यांनी (लेहरा) साथसंगत केली.
सरोद
वादक पं. राजन कुलकर्णी व त्यांचे सुपुत्र सारंग कुलकर्णी यांच्यात वाचस्पती रागामधे
सरोद जुगलबंदी झाली त्यांना नवाझ मिरजकर व केतन बिडवे (तबला) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाची
सांगता तालयोगी पंडित सुरेश तळवलकर व त्यांची कन्या सावंनी तळवलकर यांच्या तबला जुगलबंदीने
झाली. छपताल मधे झालेल्या या जुगलबंदीला रसिकांनी भरभरून दाद दिली. त्यांना चिन्मय कोल्हटकर (हार्मोनियम), ओंकार दळवी
(पखवाज), नागेश अडगांवकर (गायन) यांनी साथसंगत केली.. तत्पूर्वी पालकमंत्री मा. गिरीश
बापट यांच्या हस्ते पंडित सुरेश तळवलकर यांना तालविश्व उस्ताद मेहबूबखानसाहेब मिरजकर
पुरस्काराने गौरवण्यात आले, या वेळी तळवलकरांनी गुरू-शिष्य परंपरा व वादनाच्या पारंपारीक
शैलीचे जतन झाले पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला
जेष्ठ तबला वादक आनंद सिधये, जेष्ठ वायोलिन वादक उस्ताद फैय्याज हुसेन, जेष्ठ तबला
वादक विठ्ठल क्षीरसागर, बासरी वादक पंडित राजेंद्र कुलकर्णी, शहनाई वादक पंडित प्रमोद
गायकवाड असे अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नवाझ व रिझवान मिरजकर बंधूंनी
केले तर कार्यक्रमाचे निवेदन सिध्दार्थ बेंद्रे यांनी केले.
करुणा पाटील- 9860402780