पुणे सुपरफास्ट न्यूज-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी सकाळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर पोहोचल्याने पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. फडणवीस आणि विद्यासागर राव यांच्या भेटीमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. सुमारे ४० मिनिटे या दोघांमध्ये चर्चा झाली. येत्या सोमवारपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू आहे. या विस्तारामध्ये स्वाभिमानी पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षालाही स्थान दिले जाणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, अधिवेशन सुरू होण्याला तीन दिवस उरले तरी अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. शिवसेनेच्या विद्यमान मंत्र्यांना आणि विस्तारात समावेश होणाऱ्या नवीन मंत्र्यांना महत्त्वाची खाती मिळावीत, ही शिवसेनेची भूमिका असून देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा पूर्ण होऊ न शकल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार रखडण्याची चिन्हे वर्तविण्यात आली आहेत. शिवसेनेला महत्त्वाची खाती देण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी नसून, शिवसेनेनेही अजून आपल्या मंत्र्यांची नावे पाठविली नसल्याने शिवसेनेला वगळून विस्तार होऊ शकत नाही. भाजप-शिवसेनेत महामंडळांचे वाटपही अजून अनिर्णित असल्याने व मंत्रिपदांसाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच असल्याने असंतोष टाळण्यासाठी विस्तार लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. विस्तारात भाजपच्या पाच किंवा सहा मंत्र्यांना शिवसेनेच्या दोन, स्वाभिमानी पक्ष व रासपयांना प्रत्येकी एक मंत्रिपद दिले जाणार आहे.


 
Top