बोरीवली (पुणे सुपरफास्ट न्यूज)-
पलूस, सांडगेवाडी येथील वाईन पार्कमध्ये दारू तयार करण्यासाठी द्राक्षांची खरेदी करून २५ शेतकऱ्यांची एक कोटी ६२ लाख रुपयांची फसवणूक बोरिवली येथील पवार कुटुंबीयांनी केली असल्याची फिर्याद रामचंद्र कोंढीबा नाळे (वय ६२, रा. शेलीवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांनी बोरिवली पोलिस ठाण्यात दिली आहे. 
 हा गुन्हा पलूस पोलिस ठाण्याकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. वारंवार शेतकऱ्यांनी वाईन द्राक्षांचे पैसे मागूनही पवार कुटुंबीयांनी चालढकल केली. शेतकऱ्यांनी अनेकवेळा त्यांच्याकडे हेलपाटे मारले. पण पवार कुटुंबीयांनी दाद दिली नाही. 
 त्यामुळे अखेर रामचंद्र नाळे यांनी बोरिवली पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली. बोरिवली येथून गुन्हा तपासासाठी जिल्हा पोलिस कार्यालयाकडे वर्ग होऊन अधिक तपासासाठी पलूस पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक शंकर पांचाळ हे याप्रकरणी तपास करीत आहेत. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.
याबाबत पलूस पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी - १६ फेब्रुवारी २०१५ ते १८ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत पलूस-सांडगेवाडी वाईन पार्कमधील मदर युनिट येथे आरोपी संभाजी पांडुरंग पवार (वय ६४), श्रद्धा संभाजी पवार (६१), अमेय संभाजी पवार (२७, सर्व रा. बोरिवली पूर्व) यांनी रामचंद्र कोंडिबा नाळे यांची पाच लाख ५० हजार रुपये किमतीची इतर २५ शेतकऱ्यांची एक कोटी ५६ लाख ६७ हजार १२० रुपये अशी एकूण एक कोटी ६२ लाख १७ हजार १२० रुपये किमतीचे द्राक्षे खरेदी केले होते. मात्र ही रक्कम न देता त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
 
Top