पुरंदर ( पुणे सुरफास्ट न्युज ) -
                   कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, वनपुरी, हगवणेवस्ती तसेच पुरंदर हायस्कूल समोरील सासवडकर नागरिक या सर्वांचाच विचार मानवतेच्या भावनेतून व्हायला हवा. मात्र नगरपालिकेला आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यावर राजकारण करत बसण्यात जास्त रस दिसत आहे. नगरपालिकेचा विकास आराखडा बनवताना नगरपालिकेने आपल्या हद्दीत कचरा डेपो आणि प्रक्रिया केंद्र यासाठी कुठेच जागेची तरतूद केलेली नाही आणि आता मात्र कुंभारवळणच्या जागेसाठी बळकशी येण्याचा चुकीचा प्रकार सुरु आहे. राजकारण बाजूला ठेवल्यास सर्वसहमतीने सासवडच्या कचरा प्रश्नाचे आव्हान पेलण्यास आपण तयार असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री शिवतारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
              शिवतारे म्हणाले, कुंभारवळणच्या जागेला येथील ग्रामस्थांनी सुरवातीपासूनच तीव्र विरोध दर्शवला होता. तो लक्षात घेऊन नगरपालिकेने आपला हेका पुढे रेटला नसता तर आज ही विपरीत परिस्थिती निर्माण झाली नसती.  कचरा प्रक्रिया प्रकल्प केवळ १०-२० गुंठे जागेचा प्रश्न असून तो सासवड शहर हद्दीतच लोकवस्तीपासून दूर अशा ठिकाणी मार्गी लावता येऊ शकेल असे मी त्यावेळेपासूनच सांगत आलो आहे. पुणे शहराच्या फुरसुंगी येथील कचरा डेपोमुळे झालेले भयानक नुकसान डोळ्यासमोर असताना सासवडचा कचरा कुंभारवळण पंचक्रोशीत नेऊन टाकणे म्हणजे आत्महत्या ठरेल या माझ्या मतावर मी आजही ठाम आहे. त्यामुळेच कुंभारवळणला कचरा डेपो करण्यास माझा ठाम विरोध कायम आहे.
                       शिवतारे पुढे म्हणाले, सासवड शहर हद्दीत प्रदूषणमुक्त आणि कार्यक्षम कचरा प्रक्रिया प्रकल्प करता येणे सहजशक्य आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील जनतेच्या जीवाशी खेळणे चुकीचे आहे. नगरपालिकेने या संदर्भात राजकारण बाजूला ठेवून सकारात्मक भूमिका घेतल्यास आणि कुंभारवळणची जागा सोडल्यास या प्रश्नावर योग्य ते सहकार्य करायला मी तयार आहे असेही शिवतारे म्हणाले.(प्रतिनिधी - निखील जगताप)

 
Top