पुणे : (पुणे सुपरफास्ट न्युज ) - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षिक बैठकीमध्ये पुण्याला कसोटी केंद्राचा दर्जा देण्याचा निर्णय झाला. या बैठकीमध्ये एकूण सहा नव्या स्टेडियमला कसोटीचा दर्जा मिळाला. यामध्ये पुण्यासह राजकोट, विशाखापट्टणम, धर्मशाला, इंदूर आणि रांची यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याचे यजमानपद भूषविण्याची संधीही पुण्याला लगेचच मिळण्याची शक्‍यता आहे.
‘बीसीसीआय‘च्या वार्षिक बैठकीमध्ये नव्या स्टेडियमला कसोटी दर्जा देण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर सचिव अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील चौथी आणि शेवटची कसोटी दिल्लीमध्ये होणार आहे. मात्र, ‘बीसीसीआय‘च्या निकषांनुसार या सामन्याची तयारी पूर्ण झाली नसल्यास आणि त्यासाठी आवश्‍यक त्या सर्व परवानगी मिळविण्यात अपयश आल्यास हा सामना दिल्लीऐवजी पुण्यामध्ये घेतला जाऊ शकतो, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. भारत-दक्षिण आफ्रिकेमधील चौथा कसोटी सामना 3 डिसेंबरपासून फिरोझशाह कोटला मैदानावर सुरू होणार आहे. मात्र, सध्या दिल्ली क्रिकेट संघटना आणि राज्य सरकारमध्ये मनोरंजन कराच्या मुद्यावरून वाद सुरू आहे. राज्य सरकारने दिल्ली क्रिकेट संघटनेकडे 24.45 कोटी रुपयांचा मनोरंजन कर भरण्याची मागणी केली आहे. या वादामुळे फिरोझशाह कोटला मैदानावर पुढील सामने घेण्यास दिल्ली सरकार मनाई करू शकते, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. (प्रतिनीधी निखिल जगताप)
 
Top