पुणे ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - 
निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या ५० ते ६० घरांच्या गावामध्ये डोंगरकडा कोसळल्याने अनेक घरे ढिगा-याखाली कायमची गाडली गेली. गावातील जनजीवन उध्वस्त झाले, परंतु गावक-यांनी उभारी धरुन संपूर्ण गाव उभे करण्याकरीता हातभार लावला. माळीणमधील चिमुकल्यांसोबत दिवाळी आणि बालदिन साजरा करण्याकरीता पुण्यातील तरुणाईने पुढाकार लावला. बालदिनानिमित्त वहया व खाऊ मिळाल्यानंतर चिमुकल्यांच्या चेह-यावर हसू उमलले.
लाईफ संस्थेतर्फे वही आपली भविष्य त्यांचे या अभियानांतर्गत माळीणमधील न्यू इंग्लिश स्कूल माळीण, कृष्णा यशवंत भालचिम माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुणे पोलीस नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एल.काशिद, माळीणमधील प्रदीप विरणक, चंद्रकांत अंकुश, जालिंदर झांजरे, लक्ष्मी झांजरे, अजय झांजरे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ओंकार कोंढाळकर, भूषण पवार, तेजस कोंढरे आदी उपस्थित होते.
काशिद म्हणाले, माळीणमधील शालेय विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा करण्याकरीता पुण्यातून आलेल्या तरुणाईचा उत्साह मोठा आहे. शहरातील वंचित आणि अनाथ घटकांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सण-उत्सव व दिनविशेषांची माहिती यामाध्यमातून होत आहे. कोंढाळकर म्हणाले, वही आपली भविष्य त्यांचे या अभियानांतर्गत पुण्यातून हजारो वहया गोळा झाल्या आहेत. पुणे जिल्हयातील ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत हे साहित्य पोहोचविण्यात आले आहे. माळीणमध्ये बालदिनाच्या माध्यमातून ही मदत द्यावी आणि दिवाळीचे औचित्य साधून आनंदोत्सव साजरा करावा, याकरीता हा उपक्रम घेण्यात आला.
 
Top