पिंपरी( पुणे सुपरफास्ट न्यूज)-
पिंपरीतील नेहरूनगर येथील तीन सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेल्या टोळीप्रमुखावर तब्बल ३० गुन्हे दाखल आहेत. 
        पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सैफन मुजावर यांनी माहिती दिली. अमर उर्फ रिंकु कुलवंतसिंग चौहान (रा. मित्तल मेडीकलसमोर, नेहरूनगर, पिंपरी) या टोळीप्रमुखासह त्याचे साथीदार दिलीप इंद्रजितसिंग चौहान (वय १९) मनप्रित उर्फ बिट्टू सुखदेवसिंग माही (वय १९, दोघे रा. नेहरूनगर, पिंपरी) अशी 'मोक्का' अंतर्गत कारवाई केलेल्या तीन गुन्हेगारांची नावे आहेत. 
    अमर व त्याच्या साथीदारांविरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, जबरी चोरी, सोनसाखळी हिसकावणे, दरोड्याची तयारी करणे, घरफोडी, चोरी, वाहन चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळीप्रमुख अमर याच्याविरूद्ध तब्बल ३० गुन्हे दाखल आहेत. तर दिलीप आणि मनप्रितविरूद्ध प्रत्येकी चार गुन्हे दाखल आहेत. आरोपींना 'मोक्का' कलम लावण्याबाबतचा प्रस्ताव सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते व पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी अपर पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याल यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार, तिघा आरोपींवर मोक्का लावण्यास परवानगी देण्यात आली.(प्रतिनिधी-K.D.पाटील)
 
Top