पिंपरी-(पुणे सुपरफास्ट न्यूज)
थरमॅक्स चौकातील ठाणे जनता सहकारी बँकेच्या संभाजीनगर शाखेत आज दिवसाढवळ्या थरार घडला. बँक लुटीसाठी आलेल्या दोन चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करत सुमारे ५० लाखांची रोकड असलेली बॅग पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी जीव धोक्यात घालून लुटीचा डाव उधळून लावला. या गोळीबारात एक सुरक्षा रक्षक जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास ही घटना घडली. कपिल रॉय असे गोळीबारात जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
थरमॅक्स चौकात ठाणे जनता सहकारी बँकेची संभाजीनगर शाखा आहे. येथील तीन मजली इमारतीमध्ये बँकेचा कारभार चालतो. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास कपिल रॉय हा तिसऱ्या मजल्यावरुन एका बॅगेतून ५० लाखांची रोकड जिन्याने पहिल्या मजल्यावर घेऊन येत होता. त्याचवेळी एक चोरटा त्याठिकाणी दबा धरुन बसला होता. कपिल याला रोकड घेऊन येताना पाहून या चोरट्याने कपिलवर झडप मारली. चोरट्याचा डाव लक्षात येताच कपिलने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यात दोघांमध्ये जोरदार झटापटी झाली. 
दरम्यान, या चोरट्याचा बाहेर उभ्या असलेल्या साथीदाराने कपिल रॉयवर गोळीबार केला. याठिकाणी तैनात असलेल्या दुसऱ्या सुरक्षा रक्षकाने हा प्रकार पाहिला. दरम्यान, कपिल यांच्या हातातून रोकड घेवून पळून जात असलेल्या चोरट्यावर दुसऱ्या सुरक्षा रक्षकाने वीट फेकून मारली. ही वीट वर्मी लागल्याने या चोरट्याने रोकड असलेली बॅग तिथेच टाकून बाहेर उभ्या असलेल्या साथीदार चोरट्याच्या मागे बसून दुचाकीवरुन पोबारा केला. या बॅगेतील रोकड सर्व जिन्यावर पसरली होती. 
प्रभारी सहायक पोलीस आयुक्त धनराज वाळुंजकर तसेच चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपासासाठी सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत.पुढील तपास सुरु आहे. (प्रतिनिधी-K.D.पाटील)
 
Top