पुरंदर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -

- "हरे बोला... हार... हर-हर महादेव असा जयघोष करीत ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत, उघड्या अंगाने बाभळीच्या काट्यांच्या ढीगामध्ये पाण्यात सूर मारावा अशा उड्या घेवून काट्यांमध्ये लोळणारे पुरुष भक्तांचे अक्षरश: अंगावर काटाच आणणारे रोमांचक दृष्य आज पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील  गुळूंचे  येथील "काटेबारस' यात्रेत हजारो भाविकांनी अनुभवले  "काटेबारस' यात्रेनिमित्त गुळूंचे परिसरासह राज्यातील विविध भागातून हजारो भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.,

पुणे जिल्हाय्तील पुरंदर तालुक्यातील  मौजे गुळूंचे गाव ,येथील देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून याची राज्यभर ओळाख आहे ,श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त  आज मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात "काटेबारस' साजरी करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात "काटेबारस' या नावाने प्रसिध्द असणाऱ्या यात्रेला राज्यातील विविध भागातून हजारो भाविक आवर्जून हजेरी लावतात. 
 
जागृत स्वयंभू ज्योतिर्लिंगाचे भक्त बाभळीच्या काट्यांच्या ढीगामध्ये पाण्यात सूर मारावा अशा उघड्या अंगाने उड्या घेतात, हे या यात्रेतील प्रमुख वैशिष्ट्य असल्याने पुरंदर तालुक्यातील गुळूंचे ही यात्रा महाराष्ट्रात "काटेबारस' यात्रा म्हणून प्रसिध्द  आहे. यात्रेनिमित्त दिवाळीत लक्ष्मीपूजनादिवशी मध्यरात्री घटस्थापना होवून कार्तिक शुध्द द्वादशीपर्यंत नियमितपणे छबिना आणि कीर्तन यांसारखे धार्मिक कार्यक्रम राबवले गेले. दरम्यान अखंड बारा दिवस गुळूंचेमधील ग्रामस्थांनी व महिलांनी उपवास केले... आज पहाटेपासून गुळूंचेमधील भाविकांनी प्रथेनुसार देवाला ओल्या  अंगाने दंडवत घातले. आज दुपारी पावणेएक वाजण्याच्या सुमारास देवाची पालखी बहिणीच्या (काठीच्या) भेटीसाठी टाळ- मृदंगाच्या व ढोल-ताशांच्या गजरात ज्योतिर्लिंग मंदिरापासून प्रस्थान केले. पालखीच्या भव्य सोहळ्याने काठीला प्रदक्षिणा घालून आरती केली.
दरम्यान, मंदिरासमोरील प्रांगणात बाभळींच्या काट्यांचा मोठ्या प्रमाणात भाविकांनी ढीग रचला. सुमारे एक तासाच्या कालावधीनंतर पालखीचे मंदिरासमोरील रचलेल्या काट्यांच्या ढीगाकडील प्रांगणात आगमन झाले. पालखी सोहळ्याने अत्यंत उत्साही, भक्तिमय वातावरणात नामघोष करत काट्यांच्या ढीगाला प्रथेप्रमाणे पाच प्रदक्षिणा घालून पालखी मंदिरात नेण्यात आली. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड झुंबड उडाली होती.
मंदिरासमोरील प्रांगणात रचलेल्या काट्यांच्या ढीगाऱ्याभोवती हजारो भाविकांनी वर्तुळाकार गर्दी केली होती. यात्रा कमिटीने नव्या उभारलेल्या स्टेडियम स्वरुपातील व परिसरातील इमारतींमध्ये भाविकांनी आणि महिलांनी प्रत्यक्ष सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. पालखीमागून आलेले देव अर्थात अंगात वारे आलेले पुरुष भक्त रचलेल्या काट्यांच्या ढीगांमध्ये उड्या घेण्यासाठी आसुसलेले होते.  रचलेल्या काट्यांच्या ढीगाऱ्याकडे श्वास रोखून नजर लावून असलेल्या भविकांची उत्सुकता वाढत असताना रचलेल्या काट्यांच्या ढीगाऱ्यात "हर-हर महादेवअसा जयघोष करीत एका-मागून एक असे भक्त उघड्या अंगाने उड्या घेवून काट्यांमध्ये लोळत होते. असे रोमांचकारी दृश्य पाहून उपस्थित हजारो भविकांच्या अंगावर खरोखर काटा येत होता. काट्यामध्ये उड्या घेणाऱ्या भक्ताला मंदिरात नेवून त्याच्या अंगावर राखेची विभूती टाकली जात होती., मात्र हा संपर्ण प्रकार हा अंधश्रद्धेचा प्रकार असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून राज्यभर रंगली आणि म्हणूनच यंदा या  ठिकाणी माध्यम आणि इतरांना सुद्धा छायाचित्रण करण्यास गावकर्यांनी बंदी घातली होती , कोणालाही छायाचित्रण करू दिले जात नव्हते  काट्यात उड्या मारणाऱ्या भक्तांशी बातचीत केली असता , यातून आम्हाला कोणताही त्रास होत नसल्याचेच मत त्यांनी व्यक्त केले  मात्र तरीही जीवावर बेतणारी ही कसली श्रद्धा असाच प्रश्न शेवट निर्माण होतो.
 
Top