लोणावळा ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - 
कार्ला येथील एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतणारा भाविकांचा टेम्पो पलटी झाल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज (सोमवारी) पहाटे दोनच्या सुमारास खालापुर हद्दीत झाला आहे.
शैला कैलास बंगाली (वय-32), हौसा भगवान चमार (वय- 45), गवा वैती (वय-40), दत्ता वैती (वय- 35), धीरज पाटील (वय-30) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची नावे आहेत.
वेसावा येथील मच्छीमार कोळी वाड्यातील भाविक हे खाजगी टेम्पो करुन कार्ला येथील एकविरा देवीच्या दर्शनासाठी आले होते. 
 दर्शन घेऊन हे सर्व भाविक परतत असताना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खालापुर हद्दीत असलेल्या माडाप बोगद्याजवळ टेम्पोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात 20 भाविक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पनवेल येथील एम् जी एम् या खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
या अपघातामुळे वेसावा येथील मच्छीमार कोळी वाड्यावर शोककळा पसरली आहे.
 
Top