चिंचवड ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - चिंचवड येथील वाल्हेकरवाडी रोडवर असलेल्या एका घरावर
टोळक्याने सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एक जण
गंभीर जखमी झाला आहे.
मधुकर दाजीबा पाटील ( वय-45, रा. रजनीगंधा हौसिंग सोसायटी,
वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) हे दरोडेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले
आहेत. या प्रकरणी 5 अनोळखी दरोडेखोरांविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
वाल्हेकरवाडी रोडवरील रजनीगंधा हौसिंग सोसायटी येथे राहणाऱ्या
मधुकर पाटील यांच्या घरावर रात्रीच्या सुमारास 5 अनोळखी दरोडेखोरांनी
दरोडा टाकला.
पाटील हे कामावर गेले असल्याने घरी त्यांची पत्नी व मुले होती. पाटील यांना
सेकंड शीप असल्याने रात्री बारा वाजेपर्यन्त ते घरी येतात. काल रात्री
दरोडेखोरांनी पाटील यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. पती आले असावेत असा समज
झाल्याने त्यांनी घराचा दरवाजा उघडला. याचा फायदा घेत दरोडेखोरांनी घरात
प्रवेश केला. व पाटील यांच्या पत्नीला कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या
अंगावरील व घरातील 17 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले.
या कालावधीत मधुकर पाटील हे कामावरून घरी परतले. यावेळी घरातील
दरोडेखोरांशी पाटील यांची झटापट झाली. या झाटापटीत दरोडेखोरांनी पाटील
यांच्या हातावर व मानेवर कोयत्याने वार केले. व त्यानंतर हल्लेखोर पसार
झाले. या हल्ल्यात पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी
रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चिंचवड पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली असून ते तपास करीत आहेत.