>> शिरूर मतदारसंघातील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी लावले लांडगे यांचे फ्लेक्स
>> वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार लांडगे यांची शिरूर मतदारसंघात मुसंडी
पिंपरी ( पुणे सुपरफास्ट न्युज ) – भोसरी मतदारसंघाचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली आहे. एकेकाळी आढळराव पाटील यांचेच सहकारी असलेल्या खेड, मंचर, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील त्यांच्या समर्थकांनी तेथे आमदार लांडगे यांना शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. त्यामुळे हा एकप्रकारे खासदार आढळराव पाटील यांना इशारा मानला जात आहे. तसेच लांडगे यांनी आढळराव पाटील यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यास सुरूवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भोसरी मतदारसंघातून आमदार लांडगे यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली. त्यांचा हा विजय अनपेक्षित मानला जात आहे. माजी आमदार विलास लांडे यांच्यावरील नाराजीचा फायदा त्यांना झाला. आमदार झाल्यानंतर महेश लांडगे यांनी जनसंपर्क वाढविण्यावर अधिक भर दिला आहे. त्यात ते यशस्वी होत असल्याचेही चित्र आहे. परंतु हा जनसंपर्क वाढवित असतानाच आता त्यांनी खासदारकीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. लांडगे यांच्या समर्थकांनीही खासदारकीचा नारा देण्यास सुरुवात केली आहे.
आमदार झाल्यानंतर महेश लांडगे यांचा शुक्रवारी (दि. २७) दुसरा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या समर्थक नगरसेवक व कार्यकर्त्यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघात जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. विविध कार्यक्रम, जाहिराती व फ्लेक्सबाजीतून आमदार लांडगे यांच्या वाढत्या राजकीय ताकदीचा अंदाज येत आहे. हा वाढदिवस केवळ भोसरी विधानसभा मतदारसंघापुरता मर्यादित राहिला नसून त्याची व्याप्ती शिरूर लोकसभा मतदारसंघापर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप साडेतीन वर्षे बाकी असले तरी आमदार लांडगे यांनी आतापासूनच त्याची तयारी चालविल्याचे चित्र आहे. त्यासाठी लांडगे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला तीनवेळा पाणी पाजलेले शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समर्थकांना आपल्या कंपूत ओढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात त्यांना काही अंशी यशही आल्याचे पाहायला मिळत आहे. एकेकाळी खासदार आढळराव पाटील यांचे खंदे समर्थक असणाऱ्या खेड, मंचर, जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील अनेकांनी आमदार लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त बंडाळी केल्याचे चित्र आहे.
खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या भागात आमदार महेश लांडगे यांना शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. विशेष म्हणजे खासदार आढळराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या संतोष गावडे यांनी मंचर व जुन्नर तालुक्यात ठिकठिकाणी आमदार लांडगे यांना शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. त्यामुळे हा एकप्रकारे शिवसेना खासदार आढळराव पाटील यांना इशारा मानला जात आहे. लांडगे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शिरूर लोकसभा मतदारसंघात मारलेल्या जोरदार मुसंडीची चर्चा होत आहे. त्यातून लांडगे यांनी खासदार आढळराव पाटील यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याची आतापासूनच तयारी सुरू केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.