पुरंदर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - राज्यातील शेतक-यांना
कांदाचाळी बांधण्यासाठी सरकारने अखेर अनुदान उपलब्ध करून दिले आहे. गेल्या
काही महिन्यांपासून कांदा उत्पादक पटट्यातून अनुदानासाठी सातत्याने मागणी
केली जात होती. मात्र, निधीअभावी शेतकरी नाराज झाले होते.
कांदाचाळी बांधण्यासाठी शेतक-यांना प्रतिटन 3500 रुपये अनुदान
दिले जाणार आहे. जास्तीत जास्त 25 टनापर्यंत अनुदान मिळेल. म्हणजेच
अनुदानाची कमाल रक्कम 87 हजार 500 रुपये राहणार आहे.
अर्थात, अनुदान मिळवायचे असेल तर शेतक-यांना कर्ज काढावे
लागणार आहे. कारण, कर्ज काढलेल्या चाळींनाच अनुदान देण्याची अट टाकण्यात
आली आहे. बोगस चाळींचे प्रस्ताव तयार होऊ नयेत म्हणून ही अट ठेवण्यात आली
आहे.
कांदाचाळ योजना राबविण्याची जबाबदारी फलोत्पादन व औषधी
वनस्पती मंडळाकडे देण्यात आली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून
चाळींसाठी निधी मिळाला आहे. ही योजना पूर्वी पणन मंडळाकडे देखील
राबवण्यासाठी देण्यात आली होती.
शेतक-यांना या योजनेबाबत मार्गदर्शन हवे असल्यास तालुका कृषी
कार्यालयाशी संपर्क करता येईल, असे कृषी खात्याच्या वरिष्ठ सूत्रांनी
स्पष्ट केले. ( प्रतिनीधी निखिल जगताप )