पिंपरी चिंचवड ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - बंदुकीचा धाक दाखवून सोनाराला लुटण्याचा प्रयत्न
नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे फसला. ही घटना आज (गुरुवारी) सायंकाळी
साडेपाच वाजन्याच्या सुमारास काळेवाडी येथे घडली.
दिनेश भंवरलाल सोनी (वय- 32, रा. शिवशंकर कॉलनी,थेरगाव) हा
सोनार चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झाला आहे. या प्रकरणी तीन अनोळखी
इसमांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथील धनगरबाबा
मंदिराच्या पाठीमागे सोनी यांचे हरिओम ज्वेलर्स या नावाने सोन्या-चांदीचे
दुकान आहे. आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तीन अनोळखी इसम दुकानात आले. व
सोनं गहान ठेवण्याचा बहाना केला. त्यानंतर त्यांनी दुकानाचे सेटर ओढुन घेत
सोनी यांना बंदुकीचा व तलवारीचा धाक दाखवला.
यावेळी एका चोरट्याने सोनी यांच्या डोक्यात चाकुने वार केले.
त्यामुळे सोनी यांनी आरडाओरड केली. त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारचे दुकानदार
तेथे आले व त्यांनी दुकानाचे सेटर उघडले. त्यामुळे चोरटे गडबडले व लुटीचा
सर्व माल तेथेच टाकून त्यांनी पळ काढला. जखमी सोनी यांना खाजगी रुग्णालयात
दाखल करण्यात आले आहे.
वाकड पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम फड़ तपास करत आहेत.
