14 हजार रुपये पगारवाढीचा निर्णय
पिंपरी ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या फोर्स मोटर्स कंपनीच्या कर्मचा-यांना अखेर न्याय मिळाला आहे. मूळ पगारात तब्बल 14 हजार रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबइत झालेल्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.
फोर्स मोटर्स कंपनीतील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबइतील सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेण्यात आली. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, फोर्सचे मालक अभय फिरेदिया, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, कामगार मंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री विजय देशमुख, खासदार अमर साबळे,  आमदार लक्ष्मण जगताप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, भाजपा नेते एकनाथ पवार, नगरसेवक दत्ता साने, कामगार आयुक्त जावळे, फोर्सचे संचालक प्रशांत इनामदार, कामगार प्रतिनिधी भरत शिंदे, हमीद शेख आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार महेश लांडगे यांनी  मुख्यमंत्री फडणवीस आणि कंपनीचे मालक फिरोदिया यांच्याकडे कामागारांच्या प्रश्नांबाबत बाजू मांडली. मूळ वेतन 40 हजार रुपये मिळावे, अशी कामगारांची मागणी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कामगार आणि कुटुंबिय सनदशीर मार्गाने आंदोलन करीत आहेत. मात्र, अद्याप कामगारांना न्याय मिळालेला नाही. कामगारांच्या हिताचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे साकडेही त्यांनी यावेळी उपस्थितांना घातले.
दरम्यान, फोर्सचे मालक अभय फिरोदिया यांनी कामगारांना पगारामध्ये दहा हजार रुपये वाढवून देण्याचे मान्य केले. मात्र, कामगारांनी त्यास नकार दिला. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मालक आणि कामगारांच्या प्रतिनिधींच्या वादात हस्तक्षेप करीत कामगारांना 14 हजार रुपये पगारात वाढविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे फोर्सचे मालक फिरोदिया यांनी मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या तोडग्याचा मान ठेवला आणि कामगारांच्या पगारात 14 हजार रुपये वाढ करण्याचा मार्ग मोकळा झाला.
...तुम्ही हात जोडले की भिती वाटते!
फोर्स मोटर्स कंपनीतील कामगारांच्या प्रश्नांबाबत सर्वप्रथम आमदार महेश लांडगे यांनी माझी भेट घेतली होती. मात्र, कामगारांच्या पगाराचा विषय न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे कोणताही ठोस निर्णय झाला नाही. पण, कामगारांच्या मागण्यांबाबत आमदार लांडगे यांनी माझ्याकडे हात जोडले. पण,  आमदार लांडगे यांनी हात जोडले की, आम्हाला भिती वाटते, असा विनोद फोर्सचे मालक अभय फिरोदिया यांनी केला. त्यामुळे बैठकीला उपस्थितांमध्ये सर्वांच्याच नजरा उंचावल्या. कामगार प्रतिनिधी म्हणून आमदार लांडगे यांनी बाजू लावून धरली होती. त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कौतुक केले. कामगारांच्या हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री फडणवीस आणि कंपनीने सकारात्मक भूमिका घेतल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.
 
Top