लंडन ( वृत्तसंस्था ) -भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिटन दौऱ्यावर आहेत. काल(शुक्रवारी) लंडनमधील वेम्बले स्टेडियमवर ६० हजार भारतीय समुदायासमोर भाषण केले. भारत सर्वार्थानं सामर्थ्यशील देश आहे. भारत हा तरुणांचा देश असल्याने प्रगतीची मोठी संधी आहे. त्यामुळे भारताला जगाकडून उपकार नको आहेत, बरोबरीचे स्थान हवं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लंडनच्या वेम्बले स्टेडियमवर जगाला ठणकावून सांगितलं.नरेंद्र मोदींचे भाषण वेम्बले स्टेडियममध्ये सुरु होण्यापूर्वी जवळपास ६०० भारतीय आणि लंडनमधील कलाकारांनी काही परफॉमन्स सादर केले. मराठमोळ्या ढोल ताशांपासून ते राजस्थानी नृत्याची झलकही यावेळी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे यावेळी भारत आणि इंग्लंडच्या संस्कृतीचा मिलाफ असणाऱ्या काही परफॉम्सनी उपस्थितांची मनं जिंकून घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरी यांची भेट घेतली. बकिंगहॅम पॅलेसमध्ये या दोघांची भेट झाली. राणी एलिझाबेथ यांनी मोदींसाठी खास मेजवानीचंही आयोजन केलं होतं.

लंडनमधलं प्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालय आता भारतातही सुरू होणार आहे. २०१७ साली हे संग्रहालय दिल्लीत सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ब्रिटनमध्ये याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
 
Top