पुरंदर (पुणे सुपरफास्ट न्युज)
राज्यातील शेतक-यांसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून
ड्रीप-तुषारसंचासाठी अनुदान मिळणार आहे. मात्र, योजनेसाठी अर्ज दाखल
करण्याची मुदत 15 नोव्हेंबरपर्यंत राहील, अशी माहिती कृषी विभागाच्या
सूत्रांनी दिली.
राज्यात ड्रीपचे अनुदान वाटतांना अवर्षणप्रवण क्षेत्रातील
म्हणजे दुष्काळी भागातील अल्प-अत्यल्प भूधारक शेतक-याला जादा अनुदान मिळणार
आहे. हे अनुदान 60 टक्के असेल. मात्र, दुष्काळी भागातील साधारण शेतक-याला
15 टक्के कमी अनुदान मिळेल म्हणजेच एकूण 45 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील अल्प-अत्यल्प भूधारक शेतक-याला
45 टक्के तर अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील साधारण शेतक-याला फक्त 35 टक्के
अनुदान द्यावे, अशी सूचना शासनाने केली आहे.
प्रधानमंत्री सिंचन योजनेतून ड्रीप आणि स्प्रिंकलरसाठी शेतक-याने ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
योजनेतील संचात अडचण असल्यास कंपनीकडून तीन वर्षे दुरूस्ती
सेवा देखील मिळणार आहे. कारण, शेतक-यांना दुरूस्ती सेवा देण्याची अट मान्य
करणा-या कंपन्यांनाच संच विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
अनुसूचित जमाती वर्गासाठी आठ टक्के, अल्प-अत्यल्प भूधारक
शेतक-यांसाठी 50 टक्के अनुदान वाटावे. तसेच, महिला शेतक-यांवर 30 टक्के
निधी खर्च करावा, असे आदेश शासनाने दिलेले आहेत.
महिला शेतक-यांवर 30 टक्के अनुदान खर्च करतांना त्यात 15
टक्के अल्प-अत्यल्प भूधारक असाव्यात आणि 15 टक्के महिला या साधारण गटातील
असाव्यात, असे शासनाचे म्हणणे आहे.
अवर्षणप्रवण क्षेत्रात आपला तालुका आहे की नाही याची खात्री
शेतक-यांनी तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयात करावी लागणार आहे. तसेच,
तालुका कृषी अधिकारी कार्यालयात देखील माहिती मिळू शकते.
दरम्यान, ऑनलाईन अर्ज करताना शेतक-यांना अडचणी येत असल्यास
तालुका कृषी कार्यालयात लेखी अर्ज देता येईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
( प्रतिनीधी- निखिल जगताप )