जुन्नर नगरपरिषदेच्या निवडणूकीकडे जिल्ह्याचे लक्ष्य


जुन्नर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -  सध्याच्या स्थितीनुसार नगरपरिषदेमध्ये शिवसेनेचे सात, राष्ट्रवादीचे सहा व मनसेचे दोन असे नगरसेवक आहेत. मनसेच्या दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादीला पाठींबा दिल्याने राष्ट्रवादीने नगरपरिषदेवर वर्चस्व मिळविण्यात यश मिळविले. काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या राणी शेळकंदे या नगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. उपनगराध्यक्ष म्हणून मनसेच्या माधुरी जोगळेकर यांची वर्णी लागली आहे.
जुन्नर नगर परिषदेच्या दोन जागांसाठी अटीतटीची पोटनिवडणुक होत आहे. या निवडणुकीवरच राष्ट्रवादी व शिवसेना यांचे वर्चस्व स्पष्ट होणार आहे. दोन जागांवर आपले वर्चस्व राहावे, यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा या तिन्ही पक्षांनी संपूर्ण ताकद पणाला लावलेली आहे. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
जुन्नर नगर परिषदेमध्ये शिवसेनेने नऊ जागा मिळवित वर्चस्व मिळविले होते. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष शिवसेनेचेच झाले होते. परंतु राष्ट्रवादीने खेळी करत नंतर झालेल्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीत संगिता भाऊबंदे व संगीता कर्डिले यांना फोडण्यात यश मिळविले. नगराध्यक्षपद मिळविण्यात यश मिळविले होते. परंतु शिवसेनेच्या तिकीटावर निवडूण आलेल्या भाऊबंदे व कर्डिले यांनी पक्षाचा आदेश न जुमानता राष्ट्रवादीला मदत केल्याने शिवसेनेने दोन्ही नगरसेविकांवर कारवाई करत अपात्रतेचा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार दोन्ही नगरसेविकांना अपात्र ठरविण्यात आले. प्रभाग क्र. २ व ४ मध्ये अपात्र ठरलेल्या भाऊबंदे व कर्डिले यांच्या रिक्त जागेवर सध्या पोट निवडणूक होत आहे.
ही पोट निवडणूक दि. १ नोव्हेंबर २0१५ रोजी होणार असून दोन्ही प्रभागांमधून एकुण सहा उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. प्रभाग क्र. २ मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने वृषाली काजळे, शिवसेनेच्या वतीने सुवर्णा बनकर, भाजपाच्या वतीने कविता गुंजाळ तर प्रभाग क्र. ४ मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने परवीनबानो अब्दुलहमीद मोमीन, शिवसेनेच्या वतीने माया शामसिंग खोत, व अपक्ष उमेदवार दर्शना वाघोले अशी लढत होत आहे. या लढतीकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून आहे. सध्या होत असलेल्या पोट निवडणुकीत राष्ट्रवादी व शिवसेना दोन्ही जागा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
 
Top