दौंड ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - केडगाव (ता.दौड़) परिसरात गुळ खरेदीसाठी आलेल्या पौंड (ता.जामनेर ,जि.जळगाव) येथील व्यापाऱ्याचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.सहा दिवसांपूर्वी सदर व्यापारी गुळ खरेदी करण्यासाठी आला होता.मात्र तो परत घरी न गेल्याने आज (दि.२१) रोजी त्याच्या नातेवाईकांनी यवत पोलिसात बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. सुभाषचंद्र जैन (वय - ६५) असे सदर खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
सदर प्रकरण संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला असता व्यापाऱ्याचा मृतदेह केडगाव गावाच्या हद्दीत मिळून आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली.खुनाचे नेमके कारण अद्याप पर्यंत स्पष्ट झालेले नाही.यवत पोलिसांनी याप्रकरणी व्यापारी गुळ खरेदी करत असलेल्या गुर्हाळातील परप्रांतीय कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते.
सुभाषचंद्र जैन हे मागील काही वर्षांपासून दौड़ तालुक्यातील गुळाच्या गुर्हा ळांमध्ये गुळाच्या खरेदीसाठी येत असत.मागील सहा दिवसांपूर्वी ते जळगाव वरुण सुमारे सहा लाख रुपये घेऊन गुळ खरेदीसाठी आले होते. त्यानंतर अचानक घरातील कोनाशीही त्यांचा संपर्क न झाल्याने अखेर त्यांचे नातेवाईक आज तपास करण्यासाठी आले होते.घटनेची माहिती घेत पोलिसांनी तपास केल्यानंतर केडगाव - पारगाव रस्त्यावर रेल्वे उड्डाण पुला नजिक असलेल्या पेट्रोल पंपानजिक असलेल्या गुर्हाळापासून काही अंतरावर झाडीत त्यांचा मृतदेह मिळून आला.
सदर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.पुढील तपास पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस करत आहेत.

