पिंपरी ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - काळेवाडी आणि रहाटणी परिसरात हाणामारी आणि गाड्यांची तोडफोड करण्याच्या
प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. रहाटाणी येथे रविवारी (दि. २५) पहाटे एका
मोटारीची अज्ञातांनी तोडफोड केल्याचे समोर आले आहे. या भागात वाढत असलेल्या
गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी (दि.
२३) रात्री काळेवाडीतील तारकीरमळा येथे दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली
होती. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. शनिवारी
रात्री साडेसातच्या सुमारास काळेवाडीतीलच नढेनगर परिसरात दोन गटांत
हाणामारी झाली आहे. त्यावेळी एका गटाने दुसऱ्या गटाच्या दुचाकीची मोडतोड
केली मात्र त्याबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. याशिवाय
काळेवाडीत लूटमार आणि शस्त्रे बाळगल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत.
काळेवाडी परिसरात हाणामारी, गाड्यांची तोडफोड किंवा सोसायट्यांमध्ये
लावलेल्या गाड्यांना आग लावण्याच्या घटना नेहमीच घडत आहेत. येथील
गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात पोलिस यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे
चित्र पाहायला मिळत आहे. आता हे गुन्हेगारीचे लोन रहाटणी परिसरातही पोहोचले
आहे. रविवारी पहाटे विश्वनाथ दगडू नखाते (रा. श्रीनगर, रहाटणी) यांच्या
घरासमोर लावण्यात आलेल्या मोटारीची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी
विश्वनाथ नखाते यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी
अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ( प्रतिनिधी -मेहबूब शेख )
