पुणे  ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -
राज्यात शेतक-यांना कृषिभूषण पुरस्कार देण्यासाठी निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. पुरस्कारासाठी शेतक-यांना जिल्हा पोलिस प्रमुखाकडून चारित्र्याचा दाखला मिळवावा लागेल. प्रस्तावासोबत हा दाखला सादर करणे बंधनकारक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रयोगशील शेतक-यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या कृषी खात्याने कृषिभूषण पुरस्कार देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.
यंदा कृषिभूषण पुरस्कारासाठी प्रस्ताव देण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत आहे. प्रस्तावाबाबत शेतक-यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे मार्गदर्शन घ्यावे लागणार आहे.
पुरस्काराचा प्रस्ताव देतांना शेतक-यांसाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. त्यानूसार, शेतक-याने स्वतःच्या चारित्र्याचा दाखला हा जिल्हा पोलिस प्रमुखाकडून मिळवायचा आहे. चारित्र्य दाखला मुळ प्रतीमध्येच सादर करावा लागेल.
याशिवाय शासनाच्या कोणत्याही संस्थेत नोकरी करीत नसल्याचे प्रतिज्ञापत्र 100 रुपयाच्या स्टॅम्पपेपरवर द्यावे लागेल.
सातबाराचा आणि ‘आठ-अ’चा मुळ दाखला तसेच पासपोर्ट आकाराचे फोटो देखील सादर करावे लागतील. पुरस्कारर्थींसाठी जिल्हास्तरावर पहिली निवड समिती असेल.
विभागीयस्तरावर दुसरी निवड समिती राहील. आयुक्तालयात तिसरी समिती असेल. कृषी आयुक्त या समितीचे अध्यक्ष असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्काराची रक्कम 75 हजार रुपये आहे. वसंतराव नाईक कृषिभूषण आणि जिजामाता कृषिभूषण पुरस्काराची रक्कम 50 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.
या पुरस्कारांचे वितरण करण्यासाठी कृषी विभागाकडून एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले जाते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतक-यांच्या गौरव केला जातो.
 
Top