नवी दिल्ली ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - रणजी ट्रॉफीच्या सामन्या दरम्यान गौतम गंभीर व मनोज तिवारी यांच्यात आज (शनिवारी) भर मैदानात जुंपली. दोघांचे भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेल्या अंपायरलाही धक्काबुक्की झाल्याचे वृत्त आहे.

पश्चिम बंगाल व दिल्लीदरम्यान फिरोजशाह कोटला मैदानावर रणजी सामना खेळला जात आहे.  दरम्यान दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीर व बंगालचा कर्णधार मनोज तिवारी यांच्या चांगलीच जुंपली. संध्याकाळी भेट तुला मारतोच, अशा शब्दात गंभीरने तिवारीला धमकीही दिली. त्यावर संध्याकाळी कशाला आत्ताच पहा, असे म्हणत तिवारी गंभीरच्या अंगावर धावून गेला. दोघांमध्ये सुरु झालेली झटापट सोडविण्यासाठी पंच श्रीनाथ मध्ये पडले. त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. 

गंभीर आणि तिवारी यापूर्वी आयपीएलमध्ये कोलकाता नाइटराइडर्स (केकेआर) कडून खेळले आहे. 'मी गंभीरला काहीही केलेले नाही. व्हिडिओ फुटेजमध्ये सर्व काही दिसेलच. गंभीर माझा सीनियर आहे. परंतु, त्यांने मर्यादा ओलांडल्यामुळे माझा नाईलाज होता', असे मनोज तिवारीने म्हटले आहे. तर गंभीरनेही आपली चूक नसल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल सामनाधिकाऱ्यांनी घेतली आहे. गंभीर व तिवारी याला उद्या हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. भर मैदानात झालेला वाद आणि त्यातच पंचांनाही धक्काबुक्की केल्याने दोघांवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

 
Top