अभिनेता सुबोध भावेचे दिग्दर्शकीय टच आणि शंकर महादेवन यांच्या ‘सूर निरागस हो’ या गाण्यामुळे रसिक प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झालेल्या सचिन पिळगावकर, शंकर महादेवन, सुबोध भावे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, साक्षी तन्वरसारख्या कलाकारांच्या ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे.
शंकर महादेवन यांनी साकारलेली पंडितजींची भूमिका, त्यानंतर हरहुन्नरी अभिनेते सचिन पिळगावकर यांनी साकारलेल्या खाँसाहेबांच्या भूमिकेमुळे चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. येत्या १२ नोव्हेंबरला पाडव्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी पहिले गाणे, टीझर आणि ट्रेलर लाँच करण्याचा ट्रेण्ड हिंदी चित्रपटांप्रमाणे मराठीतही येत आहे.