पुणे: सोहराब हॉल इमारतीतील क्रॉसवर्ड या पुस्तकाच्या दुकानाला लागलेली आग अग्निशामक दलाच्या जवानांनी तब्बल १३ तासांच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आणली. या दुकानातील सर्व पुस्तके जळून खाक झाली आहेत. मात्र दुकानात अडकलेल्या तिघांची सुखरूप सुटका करण्यात अग्निशामक जवानांना यश आल्याने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दि. २७ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनच्या मागच्या बाजूला ताडीवाला रस्त्यावर असलेल्या या पुस्तकाच्या दुकानातून धूर येत असल्याचे आजूबाजूच्या व्यावसायिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलीस आणि अग्निशामकदलाला त्याबाबत माहिती दिली.
अग्निशामक दलाच्या १२ गाड्या, ३ जेसीबी आणि एका क्रेनसह जवान आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. रात्रभरच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणाखाली आली असे वाटत असतानाच जळलेल्या पुस्तकाच्या गठ्ठ्याच्या आत असलेली धग आणि निखार्यांनी पुन्हा पेट घेतला आणि पुन्हा आगीने दुकानाचा आतील भाग आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली.
संपूर्ण दुकानात पुस्तके आणि प्लास्टिक याचाच साठा असल्याये ही आग पुन्हा मोठ्या प्रमाणावर पसरण्यास सुरुवात झाली. मात्र अग्निशामक दलाच्या जवानांना ती आटोक्यात आणण्यास दुपारी एक वाजण्याच्या सुमारास यश आले.
अद्याप आगीचे कारण आणि नुकसानाचे प्रमाण समजले असल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सागितले.