पुणे: फिल्म एँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन केंद्र शासनाने 29 सप्टेंबर रोजी मुंबई येथे चर्चा करण्याचा निर्णय जाहीर केल्याने आंदोलक विद्यार्थ्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
पात्रता नसताना केवळ सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्याने गजेंद्र चौहान यांची संस्थेच्या अध्यक्षपदावर ‘राजकीय नियुक्ती’ करण्यात आल्याचा आरोप करून विद्यार्थ्यांनी दीड महिन्यापासून आंदोलन सुरू केल्याने संस्थेमधील कामकाज ठप्प आहे. काही विद्यार्थ्यांनी दि. 10 पासून उपोषण सुरु केले आहे.
मात्र या समस्येतून मार्ग काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणतेही जुने संदर्भ, पूर्व अटी न ठेवता चर्चेला पुढे यावे; असे आवाहन माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी शासनाने चर्चेची तारीख निश्चित करून जाहीर केल्यास उपोषण स्थगित करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार दि.29 रोजी मुंबई येथे चर्चा करण्याचे निमंत्रण मंत्रालयाच्या उपसचिवांनी दिल्यावर उपोषण स्थगित करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी जाहीर केला.