वृत्तसंस्था (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
            भारताची सानिया मिर्झा आणि तिची स्वित्र्झलडची जोडीदार मार्टिना हिंगीस या जोडीने २०१५ वर्षांतील कामगिरीचा यशाचा कित्ता गिरवताना नववर्षांची झोकात सुरुवात केली. २०१६ च्या पहिल्याच स्पध्रेत मिर्झा-हिंगीस जोडीने डब्लूटीए ब्रिस्बेन टेनिस स्पध्रेत जेतेपद पटकावले. त्यांचे हे सलग सहावे जेतेपद आहे. या अव्वल मानांकित जोडीने अंतिम लढतीत जर्मनीच्या अँगेलिक केर्बर आणि अँड्रिया पेटकोव्हिक जोडीचा ६९ मिनिटांत७-५, ६-१ असा पराभव केला.
जगातील अव्वल क्रमांकाच्या सानिया-हिंगीस जोडीने सलग २६ सामन्यांत आपला विजयी धडाका कायम राखला आहे.  सारा इराणी व रॉबर्टा व्हिन्सी यांनी २०१२ मध्ये सलग २५ सामने जिंकले असून या जोडीने सलग पाच  स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला होता.

पहिल्या सेटमध्ये केर्बर आणि पेटकोव्हिक जोडीने मिर्झा-हिंगीसला कडवे आव्हान दिले. केर्बर-पेटकोव्हिक यांच्याकडे ४-२ अशी आघाडी होती, परंतु मिर्झा-हिंगीस या अनुभवी जोडीने ४-४ अशी बरोबरी मिळवली. नवव्या गेममध्ये त्यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंवर दडपण निर्माण केले. तरीही बिगरमानांकित प्रतिस्पर्धी जोडीने चिकाटीने खेळ करीत ५-५ अशी बरोबरी मिळवली. केर्बर व पेटकोव्हिकने सामना ५-६ असा असताना पुन्हा बरोबरी मिळवून सेट टायब्रेकरमध्ये नेला; परंतु त्यांनी मिर्झा-हिंगीसला सलग दोन ब्रेक करण्याच्या संधी दिल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला.


 
Top