पुणे सुपरफास्ट न्युज - वृत्तसंस्था               
                 व्ह्यूहात्मकदृष्टया अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या पठाणकोट हवाई तळावर आज (रविवार) झालेल्या आणखी एका बॉंबस्फोटामध्ये एक जवान जखमी झाल्याचे वृत्त सूत्रांनी दिले.
या हल्ल्यात भारतीय लष्करास आत्तापर्यंत पाच जिहादी दहशतवादी यमसदनी धाडण्यात यश आले आहे. मात्र आज सकाळी या विमानतळाच्या भागामध्ये पुन्हा गोळीबार सुरु झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे या भागामध्ये सहावा दहशतवादीही दडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) आठ सदस्यीय शोधपथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.
हवाई दलाच्या तळावर येथे हल्ला झाल्यानंतर सुरक्षा जवानांनी जोरदार प्रतिहल्ला करत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, तर नंतर सुरू झालेल्या शोध मोहिमेदरम्यान एका दहशतवाद्याला मारण्यात आले. तत्पूर्वी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन जवान हुतात्मा झाले, तर सहा सुरक्षा जवान जखमी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर अल्पकाळातच हा हल्ला झाला आहे. 
हवाई तळ उद्‌ध्वस्त करण्याच्या उद्देशाने दहशतवाद्यांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा हल्ला केला होता. हे सर्व जण पाकिस्तानस्थित जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचा अंदाज लष्करी सूत्रांनी व्यक्त केला आहे. 

 
Top