औरंगाबाद (पुणे सुपरफास्ट न्यूज)-
     देशात पुरोगामी, परिवर्तनवादी विचारधारा रुजविण्याचे काम महाराष्ट्राने केले. मात्र राज्याला समतावादी मानसिकतेच्या नेतृत्वाची आवश्‍यकता निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केले. 
 राज्यस्तरीय प्रेरणा नेतृत्वगुण व विकास शिबिरात श्री. कोकाटे बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिफार्ट सभागृहात सोमवारी (ता. 18) त्यांच्या हस्ते शिबिराचे उद्‌घाटन झाले. कृषी-अकृषी-स्वायत्त 20 विद्यापीठांतील दीडशे स्वयंसेवक शिबिरात सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना युनिटतर्फे हे शिबिर होत आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. रासेयोचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंके, संयोजक डॉ. राजेश करपे, आजीवन शिक्षण विभागाचे संचालक डॉ. किशन धाबे, डॉ. सुहास मोराळे, डॉ. चेतना सोनकांबळे उपस्थित होते.
 "सामाजिक सेवेच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकासाची जडणघडण करणारी राष्ट्रीय सेवा योजना ही प्रयोगशाळा आहे,‘‘ असे डॉ. साळुंके म्हणाले. डॉ. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शरद गावंडे यांनी आभार मानले.

 
 
Top