(पुणे सुपरफास्ट न्यूज) -
राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत भारताची या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. भारताने गतवेळी नऊ पदकांची कमाई केली होती.भारताने १६ पदकांची लयलूट करून विक्रमी कामगिरीची नोंद केली. पुरुषांच्या दुहेरीत भारताच्या सौम्यजित घोष व हरमित देसाई विजेतेपदाचे मानकरी ठरले.
सिंगापूरच्या चेन फेंगने राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेतील एकेरीत सुवर्णपदक मिळविण्याचे स्वप्न येथे साकार केले. महिलांमध्ये सिंगापूरच्या झोऊ यिहानने भारताच्या मौमा दासवर मात करीत एकेरीतील पहिलेच वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. तिने महिलांच्या सांघिक विजेतेपद व दुहेरीतील अजिंक्यपदासह तिहेरी मुकुट पटकाविला.
दीनदयाळ उपाध्याय क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत फेंगने अंतिम फेरीत भारताच्या अॅन्थोनी अंमलराजवर ११-५, ११-५, ९-११, ६-११, १४-१२, ११-७ असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. फेंगचे एकेरीतील हे पहिलेच अजिंक्यपद आहे. महिलांच्या अंतिम लढतीत यिहानला मौमाविरुद्ध ११-७, ११-५, ७-११, ११-२, ११-३ असा विजय मिळविताना फारशी अडचण आली नाही. यिहानचे या स्पर्धेतील दुसरे विजेतेपद आहे. तिने येथे सिंगापूरला सांघिक विभागात विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. महिलांच्या दुहेरीत यिहान व लिन येई यांनी विजेतेपद पटकाविताना भारताच्या मनिका बात्रा व अंकिता दास यांना ११-६, ११-९, ११-९ असे हरविले.
