दिल्ली (पुणे सुपरफास्ट न्युज) -
             केंद्र सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमामुळे (स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम) पुढील दहा वर्षांत चार ते पाच कोटी रोजगार निर्माण होणार. 
 गेल्या काही वर्षांपासून मंदीशी सामना करणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेने वर्षभरापासून मंदी झटकली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढवल्याने गुंतवणुकीचा ओघ वाढला. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत 17 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली. मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया या दोन महत्त्वाकांक्षी योजनांमुळे रोजगारनिर्मितीला बळ मिळाले. गेल्या वर्षभरात कारखाना उत्पादन, ऑटो, सेवा या क्षेत्रांत रोजगार निर्माण झाले. देशात कुशल मनुष्यबळाचे प्रमाण विकसित देशांच्या तुलनेत चार टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. येत्या काही वर्षांत कुशल मनुष्यबळाची जवळपास सर्वच क्षेत्रांत गरज भासणार आहे. त्यादृष्टीने केंद्राकडून कौशल्य विकासावर भर दिला जात आहेत.
औद्योगिक क्षेत्रासाठी सरते वर्ष नवसंजीवनी देणारे ठरले. अनियमित मॉन्सूनमुळे कृषी उत्पादनाला बसलेला फटका, वर्षभर निर्यात रोडावलेली असली, तरी औद्योगिक विकासाचा वेग वाढल्याने ही कसर भरून निघाली. कर संकलन वाढले. त्याचबरोबर घाऊक महागाई, वित्तीय तूट देखील नियंत्रणात आली. यामुळे सात टक्के विकासदर दृष्टिपथात आहे. विकासाला चालना देण्यासाठी केंद्राने केलेल्या प्रयत्नांना यश मिळत असून, पुढील वर्षात हा वेग आणखी वाढेल.
 

 
Top