कोल्हापूर (पुणे सुपरफास्ट न्यूज)-
      स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. "शौचालययुक्त महाराष्ट्रहा या योजनेचा मुख्य गाभा आहे. या पार्श्‍वभूमीवर पन्हाळा नगरपरिषदेने स्वच्छतेबाबत छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेल्या आज्ञापत्राचा आधार घेतला आहे. याशिवाय येणाऱ्या पर्यटकांना कुठे काय पाहाल, यासोबत सार्वजनिक स्वच्छतागृह कोठे आहे, याच्या माहितीचेही पत्रक दिले जाणार आहे. येथे असणारे गाईडही या मोहिमेत सक्रिय झाले असून पन्हाळा स्वच्छतेवर भर दिला आहे. वर्षाला वीस लाख पर्यटक पन्हाळ्याला भेट देतात. त्या सर्व पर्यटकांना स्वच्छतेबाबतचे आज्ञापत्र वाचता येईल किंवा त्याचे पुस्तकही देता येईल, अशी व्यवस्था नगरपालिकेने केली आहे.  
पन्हाळगड शंभर टक्के शौचालययुक्त झाला आहे. गडावर साडेचार ते पाच हजार लोकसंख्या आहे. तरीही येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. शनिवार, रविवार किंवा सुटीच्या दिवसात गडावर पार्किंगलाही जागा मिळत नाही. सुटीच्या दिवशी दररोज 25 ते 30 हजार पर्यटक भेट देतात. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे येथूनच नव्हे तर राज्यातून आणि देशातून याठिकाणी पर्यटक येतात. पन्हाळगडावरील असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय आहे. याशिवाय, बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी स्वच्छ आणि चांगली शौचालये तयार केली आहेत. याशिवाय पर्यटकांनी गडावर कोणत्याही प्रकारचा घनकचरा, प्लास्टिक कचरा करू नये यासाठीघनकचरा व्यस्थापनाबाबत छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेल्या आज्ञापत्राचा आधार घेऊन गडावर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला स्वच्छतेबाबत जागृत केले जात आहे. गडावरील कचरा गडाखाली न टाकता तो गडावरच विघटित व्हावा, असा दूरदृष्टीपणा छत्रपतींकडे होता. भाजीपाला किंवा पाचोळ्याचा वापर परसबागेत वापरून घरच्या घरी पालेभाज्यांची शेती पिकविण्याचे धडेही या आज्ञापत्रात दिले आहेत.


 
Top