नवी दिल्ली (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या
वर्गात पाठवण्याची तरतूद बदलण्याची शिफारस केंद्रीय मनुष्यबळ विकास
मंत्रालयाच्या मंत्री उपगटाने केली आहे. या उपगटाचे अध्यक्ष, राज्याचे
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज ही माहिती दिली. नव्या शैक्षणिक धोरणाची
अंमलबजावणी पुढच्याच वर्षापासून करण्याचे मोदी सरकारने ठरविले आहे.
इयत्ता पाचवीपासून विद्यार्थ्यांना
वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य ठरवावे असेही तावडे यांनी
सांगितले. सीबीएसई अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा
उत्तीर्ण होणेही केंद्राने यापूर्वी तत्वतः ठरविले होते. तावडे म्हणाले, की सध्याच्या धोरणात
साधारणतः असे दिसते की आठवीपर्यंत नापास
न करण्याचे धोरण असल्याने अनेक
विद्यार्थी तोवर पुढे पुढे जातात. पण, नववीमध्ये अनेक जण
उत्तीर्णच होत नाहीत. हा प्रकार शैक्षणिक गुणवत्तेला मारक असल्याचे मत
दिल्लीसह अनेक राज्यांच्या शिक्षममंत्र्यांनी याआधीच मांडले आहे. दरम्यान, कविवर्य आणि महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर यांच्या नावाने राज्य सरकार एक
योजना लवकरच घोषित करेल, असे राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी आज दिल्लीत सांगितले.
