पुणे (पुणे सुपरफास्ट न्यूज)-
पुणे
- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील महात्मा फुलेनगर झोपडपट्टीतील नागरिकांच्या जीवनमानात गेल्या एका
वर्षापासून आमूलाग्र बदल झाला आहे. येथील
नागरिक आधुनिक काळासोबतच "डिजिटल साक्षर‘ होत
आहेत. मोफत वाय-फायमार्फत इंटरनेटची सुविधा
प्राप्त झाल्याने दैनंदिन जीवनात ऑनलाइन पद्धतीने होणारी कामे ते एका क्लिकवर करत आहेत.
सध्या
येथील नागरिक इंटरनेटवर ऑनलाइन शॉपिंग करणे, सर्फिंग
करणे, नोकरी शोधणे आणि विविध विषयांची माहिती
मिळविणे ही कामे सध्या अत्यंत सहजपणे इंटरनेटच्या
माध्यमातून करीत आहेत. विद्यार्थ्यांना शालेय प्रकल्प तयार करण्यासाठी लागणारी शैक्षणिक माहिती
आणि कल्पना ते इंटरनेटच्या माध्यमातून मिळवत
आहेत. यापूर्वी त्यांना या कामासाठी सायबर कॅफेमध्ये जावे लागत असे. मोफत इंटरनेटची सुविधा मिळत असल्याने
विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणाऱ्या इंटरनेट
वर्गाबाबत आवड निर्माण झाली आहे. येथील युवक-युवती रोजगार संधी शोधण्यासाठी इंटरनेटचा वापर करत आहेत.
लग्नासाठी संकेतस्थळाच्या माध्यमातून वधू-वरही
शोधले जात आहेत.
