चेन्नई (पुणे सुपरफास्ट न्यूज)-
मंगळवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास संपूर्ण चेन्नई शहरात सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तामिळनाडू सरकारने शाळा, महाविद्यालयांना तातडीची सुटी जाहीर केली असून, अनेक कारखाने आणि खासगी कार्यालयेही बंद ठेवण्यात आली आहे. पावसामुळे विमानतळावरही गुडघ्यापर्यंत पाणी साठल्यामुळे विमान उड्डाणेही स्थगित करण्यात आली आहेत. बुधवारीही चेन्नई, कांचीपुरम, तिरुवल्लूरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसामुळे विविध ठिकाणी अडकलेल्यांच्या सुटका करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकातील जवान, लष्कराचे जवान यांची मदत घेण्यात येते आहे. चेन्नईसह राज्यभरात आतापर्यंत १८९ जणांचा बळी घेतला आहे. महिन्याभरापूर्वी आलेल्या रोआनू वादळानंतर चेन्नईत पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सतत पडत असणाऱ्या पावसाने चेन्नईचे जनजीवन ठप्प झालं आहे. किनाऱ्यालगत असलेल्या सर्व भागात सध्या पुराच्या पाण्याचं साम्राज्य पसरलेलं आहे. पुराच्या पाण्याचा फटका आता चेन्नई विमानतळालाही बसला आहे. रन वेवर पाणी आल्याने विमानतळावरील सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. मदतीसाठी लष्कर, नौदलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं असून एनडीआरएफची दहा पथकांचं बचावकार्यही युद्धपातळीवर सुरु आहे. याशिवाय रुळावर पाणी आल्याने १३ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर रस्त्यावरही पाणी साचलं आहे. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याचंही समोर आलं आहे. १६ नोव्हेंबरपासून शाळा बंद असून सहामाही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अनेक धरणांच्या पाणीसाठ्यानेही आता धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थितीत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बंगालच्या खाडीतील नैऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चेन्नईसह तामिळनाडूच्या इतर भागातही पावसाचा जोर अद्याप कायम असून संपूर्ण चेन्नई शहर पाण्याखाली गेले आहे.
मंगळवारी साधारणपणे १४ तासांत २० सेंटिमीटर पाण्याची नोंद झाली. त्यामुळे शहराच्या विविध भागांत पाणी साठले आहे. त्यामुळे शहराच्या ६० टक्के भागांतील वीजपुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आला. पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्यामुळे शहरातील काही रुग्णालयांमध्ये रूग्णांवर उपचार करता येऊ शकले नाही. विमानतळावरही पाणी साठल्यामुळे मंगळवारी दुपारनंतर सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. बुधवारी सकाळपर्यंत पाणी न ओसल्याने अजूनही विमानतळ बंदच आहे. बुधवारी दुपारनंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
चेन्नई शहराच्या दक्षिण भागांतून मंगळवारी सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेले अनेक चाकरमाने अद्यापही घरी परतलेले नाहीत. हे सर्वजण कार्यालयामध्ये किंवा अन्यत्र ठिकाणी अडकून पडलेले आहे. तांबरम आणि मुदिचूर भागामध्येही अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे तेथील रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येते आहेत.
शहराच्या दक्षिण भागाकडे जाणारे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असल्यामुळे त्या बाजूच्या भागाचा आणि गावांचा शहराशी संपर्कच तुटल्याची स्थिती निर्माण झाली आहे. रेल्वे स्थानकांवरही हजारो लोकांची गर्दी पाहायला मिळते आहे.

 
Top