जुन्नर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - आमदार शरद सोनवणे यांच्यासह जुन्नर तालुक्यातील 32
गावांनी पश्चिम घाट अतिसंवेदनशील क्षेत्रास विरोध दर्शविला आहे.
ग्रामपंचायतींनी या आशयाचा ठराव केंद्र शासनाकडे पाठविले आहेत.
याबाबत प्रातांधिकारी कल्याण पांढरे यांच्या उपस्थितीत 25
ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार शरद
सोनवणे यांनी पश्चिम घाट अतिसंवेदनशील क्षेत्रास विरोध दर्शविला होता.
तालुक्यातील खिरेश्वर, कोल्हेवाडी, कोपरे, जांभुळशी, सांगणोरे, मांडवे,
आंबेगव्हाण, चिल्हेवाडी, मुथाळणे, तळेरान, पिंपळगाव जोगा, अंजनावळे,
निमगिरी, देवळे, पारगावतर्फे मढ, अळू, मांदारणे, कोळवाडी, घाटघर,
अहिनवेवाडी, रोहोकडी, गोद्रे, फांगुळगव्हाण, पूर, आंबोली, भिवाडे बुद्रुक,
उच्छिल, हातवीज, भिवाडे खुर्द, आंबे, पिंपरवाडी, सुकाळवेढे या गावांचा
अतिसंवेदनशील क्षेत्रात समावेश केला असून, या गावांतून झालेल्या विशेष
सभांतून विरोध दर्शविणारे ठराव केले आहेत.
गावच्या निवासी तसेच शेती क्षेत्र सोडून वन विभागाच्या
क्षेत्रासाठी अतिसंवेदनशील क्षेत्र लागू करावे. मात्र, गावाच्या क्षेत्राचा
यात समावेश करू नये, अशा आशयाचे ठराव केले आहेत. हे ठराव फॅक्सने नवी
दिल्ली येथील पर्यावरण व वन विभागाकडे पाठविले आहेत. पश्चिम घाट
अतिसंवेदनशील क्षेत्र कायदा लागू झाल्यास आदिवासी भागातील या गावांवर अनेक
निर्बंध येणार आहेत. त्यांच्या न्याय हक्कावर गदा येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आदिवासी जनतेच्या जीवनमानावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने या
कायद्यास विरोध होत असल्याचे आमदार सोनवणे यांनी सांगितले. यापूर्वी
गावकऱ्यांची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन केले होते.
त्यामुळे पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्राला मान्यता असल्याचा समज निर्माण
झाला होता. या कायद्यामुळे येणाऱ्या निर्बंधांची माहिती आदिवासी भागातील
संबंधित गावांत दिल्यानंतर त्यांच्याकडून विरोध केला असल्याचे सोनवणे यांनी
स्पष्ट केले.