मुंबई ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - बिहारमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आहे. भाजपच्या या पराभवाचा शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून चांगलाच समाचार घेतला आहे.

लोकभावना उद्याचा जनदेश आहे. आमचे पाय जमिनीवर आहे, ज्यांचे नव्हते ते आपटले.. अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर टीकेची झोड उडवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएमपेक्षाही बिहारमध्ये शिवसेनेला मताधिक्य जास्त आहे. त्यामुळं महाराष्ट्रात आता कधीही निवडणूका घ्या, त्यात शिवसेना स्वबळावर विजयाची गरुडझेप घेईल असाही टोला लगावण्यात आला आहे.

"लोकसभा निवडणुकांच्या विजयानंतर फक्त दीड वर्षात झालेली ही पडझड आहे. या पडझडीची जबाबदारी आता कोण घेणार? बिहारात भाजपचा पराभव झाला तर पाकिस्तानात फटाके फुटतील असे शेवटी शेवटी अमित शहांनी सांगितले.

पाकिस्तानचे माहीत नाही, पण ‘बिहारा’त नितीश विजयाचे फटाके वाजले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची कारणे शेवटी त्यांनाच शोधायची आहेत. भारतीय जनता पक्षाचे काय चुकले यावर आम्ही पामर काय भाष्य करणार? विनम्रता हा सत्ताधीशांचा फक्त अलंकार नसतो तर संरक्षणाचे हत्यार असते.

बिहारच्या निकालाने दिलेला हा संदेश आहे. लालू यादव यांच्यावर ‘जंगल राज’ आणि ‘भ्रष्टाचारा’चे आरोप करूनही बिहारात त्यांचा पक्ष पहिल्या क्रमांकाचा ठरला. काँग्रेसच्या युवराज राहुल गांधींना ‘पप्पू’ ठरवूनही त्यांना बिहारात उत्तम जागा मिळाल्या. आता काँग्रेसला सत्तेत वाटा मिळेल. मोदी यांनी पंतप्रधान म्हणून बिहारात ३०च्या वर प्रचंड सभा घेतल्या. त्या सभांचे फलित म्हणायचे तर ५५ जागासुद्धा नाहीत. शिवसेना बिहारात एका जिद्दीने लढली. राष्ट्रवादी काँग्रेस, ‘ओवेसी’च्या एमआयएमपेक्षा शिवसेनेचे मताधिक्य जास्त आहे हा एक प्रकारे विजयच आहे. मोठ्या प्रमाणावर ‘साधनसंपत्ती’ पणास लावूनही बिहारात भाजपचा पराभव झाला."

 
Top