तमीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी अम्मा ब्रँडचा अधिक विस्तार करताना स्वमदत बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देणार्यांसाठी अम्मा मोबाईल फोन योजना जाहीर केली आहे. तमीळनाडूत स्वस्तात मस्त जेवण पुरविणारी अम्मा कॅटिन, रास्त दरातले अम्मा मिनरल वॉटर, रास्त दरात अम्मा सिमेंट, अम्मा फार्मसी अशा अनेक योजना लोकप्रिय झाल्या आहेत त्यात अम्मा मोबाईलची भर पडली आहे.
जयललिता या संदर्भातील घोषणा करताना म्हणाल्या की पहिल्या टप्प्यात २० हजार स्वमदत बचत गट प्रशिक्षकांना विशेष तमीळ सॉफ्टवेअर असलेले मोबाईल फोन देण्यात येणार आहेत. हे मोबाईल काँम्प्युटराईज्ड असतील. त्यासाठी १५ कोटी रूपये खर्च येणार आहे. सरकार महिला सबलीकरण आणि गरीबी निर्मूलनासाठी १९९१पासून स्वमदत बचत गटांच्या माध्यमातून काम करत आहे. सध्या यात ६० लाखांहून अधिक महिला कार्यरत असून या गटांची सदस्य संख्या ९२ लाखांवर आहे.