जेजुरी (पुणे सुपरफास्ट न्युज) -
                        उभ्या महाराष्ट्राच लोकदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीत पौष पौर्णिमेनिमित्त गाढवांचा बाजार भरला असून, जेजुरीच्या बाजारात काटेवाडी ,गावठी विविध प्रकारचे हजारो गाढवे दाखल झालेली असून पाच हजार रुपयांपासून ते तब्बल चाळीस  हजारांपर्यंत भाव या गाढवांना मिळत आहे, लाखो रुपयांची उलाढाल जरी बाजारात झाली असली तरी यंदा दुष्काळी अवस्था महाराष्ट्रावर असल्याने त्याचेही पडसाद या बाजारावर उमटले आहेत...
 उभ्या महाराष्ट्रच लोकदैवत, कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा, पौषपोर्निमेनिमित जेजुरीत मोठी यात्रा भरली जाते , या यात्रेसाठी वैदू, बेलदार,गाडीवहार ,मातीवडार, कैकाडी, मदारी,गारुडी ,घिसाडी,माकडवाले या भटक्या जमातीतील लाखोलोक जेजुरीत येतात , श्रीक्षेत्र जेजुरी  येथे पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त भरलेल्या या पारंपरिक गाढव बाजारात सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल झाली. सुमारे बाराशे गाढवांची या वेळी विक्री झाली. यामध्ये गुजरात व राजस्थानमधून आणलेल्या गाढवांचा समावेश होता. पाच  ते दहा हजार रुपये गावठी गाढवांच्या किमती होत्या तर काठेवाडी गाढवांना चाळीस हजार रुपयांपर्यंत सर्वोच्च भाव मिळाला. अशाच प्रकारचे बाजार मढी,सोनारी, माळेगाव (नांदेड)या ठिकाणी भरतात;परंतु जेजुरीचा बाजार सर्वात मोठा मानला जातो.
 जेजुरीतील बंगाळी पटांगणामध्ये दरवर्षी पारंपरिक गाढव बाजार भरविला जातो. ग्रामीण भागात गाढव हे उपयुक्त जनावर म्हणून ओळखले जाते. उंच डोंगरावर अडचणीच्या ठिकाणी, खोल डोंगर दरीत, दुर्गम भागात माती, दगड, खडी, मुरुम व इतर वाहतुकीसाठी गाढवाचा वापर केला जातो. दोन दातांच्या गाढवांना दुवान, चार दातांच्या गाढवांना चौवान, कोरा, अखंड जवान असे म्हटले जाते. आवश्यकता वाटल्यास त्याला पळवत नेऊन शारीरिक चाचणी घेतली जाते. बाजारात गाढवे विक्रीसाठी आणणारे व्यापारी पौर्णिमेअगोदर गाढवांना भरपूर खायला घालतात. गूळ व तेलही खायला दिले जाते. त्यांच्या अंगावर लाल, निळे, हिरवे असे आकर्षक पट्टे ओढून त्याला सजविले जाते. या बाजारात खरेदीसाठी प्रामुख्याने वैदु, कोल्हटी, मदारी, कुंभार, गारुडी व इतर भटक्या विमुक्त समाजातील बांधव येतात.
जेजुरीत पौष पौर्णिमेला वैदू समाज व भातु कोल्हाटी समाजाच्या जात पंचायतीचे पारंपरिक आखाडे भरले जात असत. परंतु याला बंदी घातल्याने गेल्या 2 वर्षापासून येथे कुठल्याही जात पंचायती भरलेल्या नाहीत. या वेळीही कोणतीही जात पंचायत येथे भरणार नसल्याचे माहिती मिळते .
दरम्यान, पौष पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड संख्येने भाविक जेजुरीत खंडोबाच्या दर्शनासाठी आले होते. येळकोट येळकोट जय मल्हारअसा जयघोष करीत भाविकांनी भंडार-खोबऱ्याची मुक्त उधळण केली.


 
Top