पुणे (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
         पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या अवघ्या १६ वर्षांच्या मुलीला इसिसने आपल्या जाळ्यात ओढले आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून ही मुलगी इसिसच्या संपर्कात आली. अवघ्या चार महिन्यांच्या काळात या मुलीच्या वर्तनात कमालीचा बदल झाला. इसिसच्या संपर्कातील तरुणांच्या सोशल मीडियावरील अनेक ग्रुप्समध्ये ही मुलगी सहभागी झाली. एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पुणे युनिटकडून या मुलीचे समुपदेशन सुरू करण्यात आले आहे. एटीएसच्या (दहशतवाद विरोधी पथक) पुणे युनिटचे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसचे अतिरीक्त महासंचालक विवेक फणसळकर, विशेष महानिरीक्षक निकेत कौशिक यांना पुण्यातील एक मुलगी इसिसच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. तिचा शोध सुरु केला असता शहरातील नामांकित महाविद्यालयात ही मुलगी अकरावी विज्ञान शाखेत शिकत असल्याचे समजले. उच्च विद्याविभूषीत कुटुंबातील ती असून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेल्या या मुलीला दहावीमध्ये ९० टक्के गुण मिळाले आहेत.
        चार महिन्यांपूर्वी टीव्हीवर इसिस संदर्भातील बातम्या पाहून तिने या संघटनेची अधिक माहिती मिळवायला सुरुवात केली. वृत्त वाहिनी आणि इंटरनेटमार्फत शोध घेताना श्रीलंकेतील एकाशी तिचा संपर्क झाला. सध्या हा श्रीलंकन तरुण पोलिसांच्या अटकेत आहे. तिला व्हॉट्सअ‍ॅप, व्टिटर, टेलिग्राफ आदी ग्रुप्समध्ये सामील करुन घेण्यात आले. फेसबुकवर तिने अकाऊंट उघडले. त्यामध्ये २०० च्या आसपास निवडकच तरुणांना फ्रेन्ड करुन घेतले होते. या ग्रुपमधून तिचे ‘ब्रेन वॉशिंग’ सुरु झाले. ग्रुप्समधे फिलीपिन्स, श्रीलंका, इंग्लंड, केनिया, दुबई, सौदी अरेबिया, युरोपातील तरुणही सदस्य आहेत.




 
Top